कोट्यवधीचा खर्च केलेला रस्ता दोन दिवसांत खराब

चेतन चौधरी 
Friday, 27 November 2020

जळगाव रोडचा हा रस्ता निकृष्ट दर्जाचा असल्याची तक्रार जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे करण्यात येणार आहे.

भुसावळ : शहरात अनेक वर्षानंतर सुरू झालेल्या रस्त्याचे काम निकृष्ट आहे. योग्य प्रकारचे मजबुतीकरण न करता, निकृष्ट दर्जाचे थेट डांबरीकरण करण्यात येत आहे. दरम्यान, जळगाव रोड येथील पालिका शाळा क्रमांक एकच्या समोर दोन तासांमध्ये गिट्टी टाकून डांबरीकरणास सुरुवात करण्यात आली. त्यामुळे रस्ता उखडला गेला असून, कोट्यवधींचा खर्च व्यर्थ गेल्याने या कामाची चौकशी करण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

वाचा- मंत्री यशोमती ठाकूर यांचा भाजप महिला आघाडीने केला निषेध

तांत्रिक मान्यतेनुसार गिट्टी व डांबरीकरणाचे काम होणार आहे. दबाई व मजबुतीकरणाबाबत कंत्राटदारास सूचना करण्यात आल्या आहेत. परंतु निकृष्ट कामामुळे रस्ता लवकरच उखडला असून, या रस्त्याची गुण नियंत्रकांकडून तपासणी करण्याची मागणी शिवसेनेतर्फे तालुका संघटक प्रा.धिरज पाटील, शहर प्रमुख बबलू बऱ्हाटे, माजी नगरसेवक दीपक धांडे, ऍड. नरेंद्र लोखंडे, देवेंद्र पाटील, युवा सेना शहर प्रमुख सुरज पाटील, जितेंद्र पाटील, गोकुळ बाविस्कर, अमोल पाटील व परिसरातील नागरिकांनी केली आहे.

अधिकाऱ्यांनी थेट गुन्हे दाखल करावे: दीपक धांडे
काही महिन्यापूर्वी याच कंत्राटदाराच्या निकृष्ट कामाविरोधात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले व शिवसैनिकांवर गुन्हे दाखल झाले होते. मुख्याधिकारी संदीप चिद्रावर यांनी तत्कालीन काम निकृष्ट दर्जाचे आहे हे मान्य सुद्धा केले होते व कंत्राट रद्द केला अशी माहिती दिली होती. परंतु कारवाई झालेली दिसत नाही. आता अधिकाऱ्यांनी थेट गुन्हे दाखल करावे अशी मागणी दीपक धांडे यांनी केली.

जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
जळगाव रोडचा हा रस्ता निकृष्ट दर्जाचा असल्याची तक्रार जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे करण्यात येणार आहे. तांत्रिक दोष असलेल्या या कामाची 24 तासात चौकशी करून गुन्हे दाखल न झाल्यास जिल्हा प्रमुख आमदार चंद्रकांत पाटील, तालुका प्रमुख समाधान महाजन यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news bhusawal road that cost billions is bad in two days