बहिणीचा अपघाती मृत्‍यू तरी मेहुणा जबाबदार; मग शालकाने केले अपहरण आणि..

चेतन चौधरी
Thursday, 26 November 2020

पत्नी व मुलासह सासरी दुचाकीवरुन जात असतांना झालेल्या अपघातात पत्नी व मुलाचा मृत्यू झाला. यात मयत बचावला होता. त्यामुळे शालक याला मयत राजु यानेच बहिणीला मारल्याचा संशय होता.

भुसावळ (जळगाव) : अपघातात बहिण व भाच्याच्या मृत्यूस जबाबदार असल्याच्या संशयावरुन शालकाने एका नातेवाईकाच्या मदतीने दिड महिन्यापूर्वी मेहुण्याचा खुन केल्याची घटना उघडकीस आली. या गुंतागुंतीच्या गुन्ह्यात शहर पोलिसांनी मेहनत घेत गुन्हा उघडकीस आणून दोघांना अटक केली असून दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मयत राजु शामराव मिरटकर (वय 28, रा. मोताळा) हा भुसावळ येथे बहिणीकडे वास्तव्यास होता. मयत हा मे 2020 मध्ये पत्नी व मुलासह सासरी दुचाकीवरुन जात असतांना झालेल्या अपघातात पत्नी व मुलाचा मृत्यू झाला. यात मयत बचावला होता. त्यामुळे शालक रामेश्‍वर गायकवाड (वय 22, रा.कोथळी, ता.मोताळा. जि.बुलढाणा) याला मयत राजु यानेच बहिणीला मारल्याचा संशय होता. त्यातून त्याने राजु याला संपविण्याचा डाव रचला व त्याचा घात केला.

अशी झाली उकल
साधारण दिड महिण्यापूर्वी 9 ऑक्टोबरला राजु हा भाच जावयासोबत मोताळा येथे गेला होता. तेथून तो परतला नव्हता. याबाबत मयत राजुची बहीण सुनीता युवराज पवार (रा. यावल रोड, भुसावळ) यांनी 30 ऑक्टोबर रोजी बोरखेडी (ता. मोताळा) पोलिसात भाऊ हरविल्याची व अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी तपासचक्रे फिरवल्यानंतर मयताचे भुसावळ येथील यावल नाका परिसरातून अपहरण झाल्याचे उघडकीस आले. यानंतर 20 नोव्हेंबरला हा गुन्हा भुसावळ शहर पोलिसत वर्ग करण्यात आला. 

तपास चक्रे फिरविली तरीही
त्यानंतर डिवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पो.स्टे.चे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे व एपीआय संदीप डुनगहू यांच्यासह सहकाऱ्यांनी तपास चक्रे फिरवत रमेश रामदास पवार (रा.कंडारी, ता.भुसावळ) याला 22 नेाव्हेंबरला ताब्यात घेऊन तपास चक्रे फिरविली असता त्याने, राजूचा शालक रामेश्‍वर याच्या मदतीने त्याचा घात केल्याचे सांगितले. त्यानंतर शहर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन. विचारपुस केली असता. खुन नांदुऱ्याजवळ कोठेवती केला आहे. नेमका कोठे केला हे सांगता येणार नसल्याचे आरोपींनी सांगितल्यानंतर. या गुन्ह्यात खुनाच्या दिशेने तपास करणे कठीण होत होते.

शेवटी झाला उलगडा
क्लिष्ठ प्रकरणात एपीआय संदीप डुनगडू यांनी मोताळासह परिसरातील पोलिस ठाण्यात संपर्क करुन या घटनेच्या काळात अज्ञात व्यक्तिच्या मृत्यूची नोंद आहे का? या दिशेने तपास सुरु केला असता. जळगाव जामोद (जि. बुलढाणा) येथील पोलिस ठाण्यात 31 ऑक्टोबरला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आल्याचे आढळून आले. त्यानंतर मयताची बहिण व पोलिसांनी मयताच्या कपड्यांवरुन मयताची ओळख पटविली. दरम्यान, आरोपींनी मयताची पत्नी वारली असल्यामुळे तो पत्नीच्या शोधात असल्याचे सांगितले होते. यामुळे मयताच्या बेपत्ता होण्याच्या गुन्ह्यात तब्बल 20 दिवसांचा विलंब लागला होता. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news bhusawal sister accident death on sister in low murder case police search