पंचायत समिती सभापतीच्या शासकीय निवासस्थानी चोरट्यांनी मारला डल्ला 

चेतन चौधरी 
Wednesday, 2 December 2020

चोरट्यांनी निवासस्थानातून गॅस सिलिंडर व इलेक्ट्रिक मोटार नेली. याबाबत सभापती पाटील यांनी शहर पोलिसांत तक्रार दिली आहे.

भुसावळ : येथील पंचायत समितीच्या सभापती मनीषा पाटील यांच्या सभापती निवासस्थानातून चोरट्यांनी मुद्देमाल लांबविल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. याबाबत शहर पोलिसांत तक्रार करण्यात आली. 

आवश्य वाचा- कोरोनाचा असाही फटका; रोजगार हमीची कामे मजुरांच्या प्रतीक्षेत 

मिळालेल्या माहितीनुसार, २८ ते ३० नोव्हेंबरदरम्यान शासकीय सुटी असल्यामुळे सभापती निवास तीन दिवस बंद असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी निवासस्थानाचे कुलूप तोडून ऐवज लंपास केला. ही घटना मंगळवारी सकाळी निवासस्थान उघडले असता लक्षात आली. याबाबत सभापती मनीषा पाटील यांनी सांगितले, की चोरट्यांनी निवासस्थानातून गॅस सिलिंडर व इलेक्ट्रिक मोटार नेली. याबाबत सभापती पाटील यांनी शहर पोलिसांत तक्रार दिली आहे. शहर पोलिस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या या सभापती निवासात चोरी झाल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. 

शासकीय निवास्थाने असुरक्षीत
शासकीय निवासस्थानांवर चोरट्यांनी यापूर्वीही हात साफ केल्याच्या घटना घडल्या आहेत. यापूर्वी रेल्वे न्यायालयाचे तत्कालीन न्यायाधीश यांच्या घरात दोन वेळेस चोरी झाली आहे. त्या वेळी देव्हाऱ्हातील चांदीचे देव, रोख रकमेसह लॅपटॉप लांबविला होता. त्यानंतर शहरातील एका पोलिस अधिकाऱ्याच्या सरकारी निवासस्थानावरही चोरट्याने डल्ला मारला.

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news bhusawal theft at the residence of the panchayat samiti chairman