
पुढील काळात लॉकडाउनचा दुसरा टप्पा लागणार असल्याची अफवा आहे. त्यामुळे शेतकरी घरातील शेतीमाल मिळेल, त्या वाहनाने व मिळेल त्या भावामध्ये विक्री करत असून, लॉकडाउन लागला, तर हा माल कुठे ठेवायचा, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.
चाळीसगाव (जळगाव) : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउनचा दुसरा टप्पा लावण्यात येणार असल्याची अफवा सोशल मीडियावर पसरल्याने धास्तावलेल्या शेतकऱ्यांनी घरातील धान्य मिळेल, त्या भावात विक्रीसाठी काढले आहे. चाळीसगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत दोन दिवसांपूर्वी तब्बल २५३ मक्याच्या वाहनांची विक्रमी आवक झाली.
चाळीसगाव तालुक्यात जवळपास ९० हजार हेक्टर पेरणीयोग्य क्षेत्र आहे. यात जवळपास ५० ते ५५ हजार हेक्टर कापूस व त्यापाठोपाठ मक्याची लागवड करण्यात आली आहे. यंदा मक्याचे क्षेत्र वाढल्याने तसेच मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना मक्याचे चांगले उत्पन्न मिळाले. परंतु कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पुढील काळात लॉकडाउनचा दुसरा टप्पा लागणार असल्याची अफवा आहे. त्यामुळे शेतकरी घरातील शेतीमाल मिळेल, त्या वाहनाने व मिळेल त्या भावामध्ये विक्री करत असून, लॉकडाउन लागला, तर हा माल कुठे ठेवायचा, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. त्यानुसार चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी मक्याची जवळपास २५३ वाहने म्हणजे साडेसहा हजार क्विंटल आवक झाली होती. तसेच कापूसदेखील मोठ्या प्रमाणात केंद्रावर विक्रीसाठी येत असून, केंद्राबाहेर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. सध्या मक्याला बाराशे ते पंधराशे रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे भाव देण्यात येत असून, शेतकऱ्यांना याचा काहीअंशी फायदाही होत आहे.
एकाच दिवसात एक कोटीची उलाढाल
चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत २५३ वाहने म्हणजे जवळपास साडेसहा हजार क्विंटल मका विक्रीसाठी आला होता. या खरेदी विक्रीतून चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत तब्बल एक कोटीच्या घरात उलाढाल झाली. यातून बाजार समितीला चांगले उत्पन्न मिळाले असून, पुढील काळात आवक अजून वाढण्याची शक्यता आहे.
यंदाच्या सीझनमध्ये शुक्रवारी चाळीसगाव बाजार समितीत मका विक्रीसाठी विक्रमी आवक होती. लॉकडाउनच्या भीतीमुळे आवक वाढली असून, पुढील काळात मक्याचे भाव अजून वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
- सतीश पाटील, प्रभारी सचिव, चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समिती
अशी आहे आकडेवारी
- चाळीसगाव बाजार समितीत एकूण व्यापारी संख्या : २०
- यंदा विक्रीसाठी मक्याची झालेली विक्रमी आवक : साडेसहा हजार क्विंटल
- मका विक्रीतून एका दिवसात झालेली उलाढाल : तब्बल एक कोटी रुपये
संपादन ः राजेश सोनवणे