Video : मुख्यमंत्र्यांच्या दारात कापूस, मका टाकू : आमदार मंगेश चव्हाण 

farmer aandolan
farmer aandolan

चाळीसगाव : ‘शेतकऱ्यांचा शेतीमाल खरेदी करणे ही राज्य शासनाची जबाबदारी आहे. इतर तालुक्यांच्या तुलनेत सर्वांत कमी नोंदणी चाळीसगाव तालुक्यात झालेली असताना देखील सर्वांत कमी कापूस, मका व ज्वारीची तालुक्यातील शेतकऱ्यांची शासकीय खरेदी झालेली आहे. परिणामी, आजही शेतकऱ्यांच्या घरात कष्टाने पिकवलेला शेतीमाल पडून आहे. त्यामुळे या मालाच्या खरेदीसंदर्भात योग्य निर्णय न झाल्यास मुख्यमंत्र्यांच्या दारात शेतकऱ्यांचा मका व ज्वारी आणून टाकू’, असा इशारा खणखणीत इशारा आमदार मंगेश चव्हाण यांनी दिला. 


येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भाजप व तालुक्यातील शेतकऱ्यांतर्फे करण्यात आलेल्या ठिय्या आंदोलनप्रसंगी ते बोलत होते. मका व ज्वारीची जी काही थोडी फार खरेदी झाली त्यात शेतकी संघाने स्वतःच्या मर्जीतले थोडे फार शेतकरी व काही विशिष्ट व्यापाऱ्यांचे नाव पुढे करून केली. त्यामुळे खरे शेतकरी बाजूला राहिले आणि दलालांचे फावले. याबाबत शेतकरी संघाची विभागीय चौकशी सुरु असून या संदर्भात आपण चार महिन्यांपासून पाठपुरावा करीत आहे. मात्र, गेंड्याच्या कातडीच्या सरकारने स्वतःला कोरोनापासून वाचवण्यासाठी क्वारंटाइन केले आहे. त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न दिसत नाहीत. म्हणून आज आमदार म्हणून नव्हे तर शेतकऱ्याचा मुलगा म्हणून सरकारचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरलो आहे. शेतकरी संघ या गोंडस नावाखाली शेतकऱ्यांना नाडणाऱ्यांना जनतेसमोर उघडे पाडल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही, असा इशारा आमदार मंगेश चव्हाण यांनी दिला. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती पोपट भोळे, संजय गांधी निराधार समितीचे तालुकाध्यक्ष के. बी. साळुंखे, नगराध्यक्षा आशालता चव्हाण, भाजपचे तालुकाध्यक्ष प्रा. सुनील निकम, शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, पंचायत समितीचे गटनेते संजय पाटील, बाजार समितीचे सभापती सरदारसिंग राजपूत, माजी सभापती रवींद्र पाटील, उद्धवराव माळी, सुरेश सोनवणे, पालिकेतील गटनेते संजय रतनसिंग पाटील, नगरसेवक नितीन पाटील, भास्कर पाटील, अरुण अहिरे, सोमसिंग राजपूत, चंद्रकांत तायडे, चिरागोद्दीन शेख, नगरसेविका विजया पवार, सुभाष पाटील, पियूष साळुंखे, अलकनंदा भवर, धनंजय मांडोळे, अमोल चव्हाण, महिला मोर्चाच्या शहराध्यक्ष संगीता गवळी, डॉ. महेंद्र राठोड, शहर सरचिटणीस अमोल नानकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते. 
आमदार चव्हाण म्हणाले, की आज ज्या गतीने खरेदी होत आहे ती पाहता पुढचे पीक आले तरी मालाची खरेदी होणार नाही. पाऊस सुरु झाल्याने कापूस व मका खराब होत आहे. एकीकडे शेतकऱ्यांना कोरोना मारत आहे तर दुसरीकडे हे तिघाडी सरकार जगू देत नाही. शेतकी संघात १०० क्विंटल हरभरा मार्केट कमिटीमधून खरेदी करून व्यापारी विकत असताना आपण रंगेहाथ पकडला. त्यावर शेतकी संघाचे चेअरमन आमदार स्टंट करीत असल्याचे सांगतात. मी आमदार नंतर आहे आधी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे. आता कोणती निवडणूक नाही, आमचे सरकारही नाही, कोरोनामुळे चांगले चांगले पुढारी घराबाहेर निघत नाही आहेत. मला स्टंट करायचा राहिला असता तर मी घरात बसून कागद फिरवले असते, फेसबुक लाइव्ह घेतले असते. मी ज्या दिवशी आमदार झालो त्या दिवशी मी ठरवले होते की माझ्या चाळीसगाव तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी ऊन, वारा, पाऊस मी पाहणार नाही. कोरोनाच्या काळात गेल्या चार महिन्यांपासून जनतेत वावरत असून त्यांची सेवा करीत आहे. आज शेतकऱ्यांच्या हितासाठी रस्त्यावर उतरून त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत असल्याचे सांगून त्यांनी शेतकी संघाच्या कामकाजावर जोरदार टीका केली. प्रा. सुनील निकम यांनी आंदोलनामागची भूमिका स्पष्ट केली. के. बी. साळुंखे, संजय पाटील, डॉ. सुभाष निकुंभ, पोपट भोळे, संगीता गवळी यांच्यासह शेतकऱ्यांतर्फे छबूलाल गढरी (मेहूणबारे), बालाजी पवार (धामणगाव), शामराव चव्हाण (शिरसगाव), आण्णा मराठे (करगाव), युवराज महाडिक (तरवाडे पेठ) या शेतकऱ्यांनी त्यांना आलेले अनुभव कथन केले. आंदोलनस्थळी पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांनी चोख बंदोबस्त ठेवला. 

कापूस, मका फेकून निषेध 
आमदार मंगेश चव्हाण व शेतकऱ्यांनी शेतकी संघ व राज्य शासनाच्या विरोधात घोषणा देत आंदोलनाच्या ठिकाणी शेतकऱ्यांनी आणलेला कापूस, मका, हरभरा रस्त्यावर फेकून राज्य शासनाचा निषेध केला. यानंतर आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून शहर पोलीस ठाण्यापर्यंत मोर्चा काढला. आमदार मंगेश चव्हाण हे बैलगाडीने पोलीस ठाणे गाठून स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले. या ठिकाणी प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर व तहसीलदार अमोल मोरे यांना शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांविषयीचे निवदेन त्यांनी दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com