रस्त्यावर कार झाली पंक्‍चर..दूधवाल्याला दिसला सारा प्रकार व सारे झाले उघड 

दीपक कच्छवा
Friday, 10 July 2020

पहाटे पाचच्या सुमारास शेतात दुध घेण्यासाठी मारूती व्हॅनने जात असतांना मालेगाव रस्त्यावर पिलखोडजवळ पुष्पराज हॉटेलच्या पुढे एका शेतात इंडिगो कार (एमएच. 20, आरसी 7753) पंक्‍चर काढतांना चार जण मिळून आले. पाटील यांनी त्यांची चौकशी केली असता हमारे दो आदमी आ रहे.. असे त्यांनी सांगितले.

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : चाळीसगाव तालुक्‍यात येवून गायी व बैले चोरणाऱ्या मालेगाव आणि धुळे येथील सहा जणांची टोळी पिलखोड (ता. चाळीसगाव) येथील नागरीकांच्या सतर्कमुळे मेहूणबारे पोलीसांच्या हाती लागली. पोलीसांनी सहाही जणांना जेरबंद केले असून त्यांच्याकडून गायी वाहुन नेणारी इंडिगो व दोन गायी ताब्यात घेतल्या आहेत. संशयीत चोरट्यांनी गायी जामदा (ता. चाळीसगाव) शिवारातून पाचपुते यांच्या शेतामधून चोरून नेल्याचेही उघड झाले आहे. या टोळी विरोधात मेहूणबारे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्या अटकेमुळे आणखी काही पशुधन चोरी उघडकीस येण्याची शक्‍यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. 

पिलखोड (ता. चाळीसगाव) येथील दुध व्यावसायीक भैय्या पांडुरंग पाटील हे आज पहाटे पाचच्या सुमारास शेतात दुध घेण्यासाठी मारूती व्हॅनने जात असतांना मालेगाव रस्त्यावर पिलखोडजवळ पुष्पराज हॉटेलच्या पुढे एका शेतात इंडिगो कार (एमएच. 20, आरसी 7753) पंक्‍चर काढतांना चार जण मिळून आले. पाटील यांनी त्यांची चौकशी केली असता हमारे दो आदमी आ रहे.. असे त्यांनी सांगितले. भैय्या पाटील यांना शंका आल्याने गाडीत पहिले असता दोन गायी कोंबलेल्या दिसून आल्या. पाटील यांनी आपले मित्र तसेच पोलीस पाटलांना आणि मेहूणबारे पोलीसांना माहिती दिली. मेहुणबारे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बेंद्रे यांना माहिती मिळाल्यावर त्यांनी तात्काळ हवालदार रमेश पाटील, कमलेश राजपूत, अन्वर तडवी यांना घटनास्थळी पाठवले. पिलखोड ग्रामस्थांच्या मदतीने पोलीसांनी आतिक उर्फ रहेमान महंमद सलीम, महंमद शहा हरूण शहा व मैफुजर रहेमान महंमद हरूण तिघे धुळे, रहेमान शहा हारूण शहा (रा. मालेगाव) यांना पकडले. त्यापैकी दोघे जण उसाच्या शेतातून पळून जात असतांना ग्रमस्थांनी त्यांना पकडून त्यांना चांगलाच चोप दिला. तर त्यांचे दोन साथीदार शेख जलील शेख खलील व शेख सुलतान शेख अब्दुल रज्जाक दोन्ही (रा. मालेगाव ) हे (एमएच.41 झेड.9845) या पल्सर मोटारसायकलने मालेगावकडे पळून गेले. त्यांना साकुर फाटा चेक पोस्टवर ड्युटीवर असलेले पोलिसांना दूरध्वनीवरून कळवले असता या दोघाना पोलिसांनी ताब्यात घेतले. 

अन्‌ कबुल केला गुन्हा 
सहाही संशयितांना मेहूणबारे पोलिसांनी इंडिगो गाडीसह गायी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणून त्यांची चौकशी केली. या टोळीने जामदा शिवारातील नारायण पाचपुते यांच्या गोठ्यातील एक तर त्यांच्याच शेजारी असलेल्या ओंकार पाचपुते यांची एक अशा दोन गायी चोरून नेल्याची कबुली दिली. याप्रकरणी शेतकरी नाना पाचपुते (रा. जामदा) यांच्या फिर्यादीवरून सहाही जणांच्या विरोधात मेहूणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पशुधन चोरीच्या घटना येणार उघडकीस 
कोरोनामुळे शेतकऱ्यांसह नागरीक हतबल असतांनाच तालुक्‍यात पशुधन चोरीचे प्रकार वाढले आहेत. जामदा येथील दोन गायी कारमध्ये कोंबून नेणारे सहा जणांची टोळी पोलीसांच्या हाती लागल्याने यापूर्वी तालुक्‍यात चोरीस गेलेल्या पशुधनाचा तपास लागण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. आठ दिवसांपूर्वीही जामदा येथील गोकुळसिंग अमरसिंग राजपूत यांची गाय तर नारायण पडळकर यांचा बैल चोरीस गेल्याची घटना घडली होती. या प्रकरणी दोघा शेतकऱ्यांनी मेहूणबारे पोलीसात तक्रारही दिली होती. तर काल रात्री ओंकार पाचपुते यांची गाय व नाना पाचपुते यांची वासरी चोरीस गेल्याचा प्रकार घडला. त्यापैकी गाय व वासरीसह सहा चोरटे पोलीसांच्या हाती लागले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून यापूर्वीच्या चोरीच्या काही घटना उघडकीस येण्याची शक्‍यता आहे. कत्तलीच्या उद्देशानेच गाय व वासरीची वाहनात कोंबून चोरीचा प्रयत्न झाल्याचे दिसून येत आहे. मेहूणबारे पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक सचिन बेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे. 
 

संपादन : राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news chalisgaon carrying cows and car pancture road police arested