पहाटेच पाण्यावर तरंगताना दिसली बॉडी; जवळ गेल्‍यावर झाला उलगडा

दीपक कच्छवा
Friday, 20 November 2020

वाघळी (ता.चाळीसगाव)येथील जानकीबाई पाटील यांच्याकडे त्यांची मुलगी सुरेखाबाई जाधव व नातू प्रेमराज उर्फ पप्पु मुरलीधर जाधव (वय15, रा. भडगाव ह.मु.पुणे) हे काही दिवसांपूर्वी वाघळी येथे आले होते. दोन दिवसांपासून प्रेमराज हा आजीबरोबर शेतात जात होता.  

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) : आईसोबत आजीला भेटण्यासाठी आलेल्या पुण्यातील पंधरा वर्षीय बालकाचा केटीवेअरच्या बंधाऱ्यात पाय घसरून पाण्यात बुडून मृत्यु झाल्याची घटना वाघळी (ता.चाळीसगाव)येथे आज पहाटे उघडकीस आली. 

हेही वाचा- खिर्डीचा उत्‍कर्ष गिनीज बुक रेकॉर्डवर; अठरा वर्षापुर्वीचा रेकॉर्ड काढला मोडीत

वाघळी (ता.चाळीसगाव)येथील जानकीबाई पाटील यांच्याकडे त्यांची मुलगी सुरेखाबाई जाधव व नातू प्रेमराज उर्फ पप्पु मुरलीधर जाधव (वय15, रा. भडगाव ह.मु.पुणे) हे काही दिवसांपूर्वी वाघळी येथे आले होते. दोन दिवसांपासून प्रेमराज हा आजीबरोबर शेतात जात होता.  सायंकाळी शेतात शौचास जातो असे सांगून गेला. मात्र तो शेतात आणि घरीही मिळून आला नाही. त्याचा कुटुंबासह गावकऱ्यांनी वाघळी गाव परिसर व केटीवेअर परिसरात रात्रभर शोध घेतला असता मिळून आला नाही. प्रेमराज हा न सांगता पुण्याला मामाकडे गेला असावा असे वाटल्याने पुण्यात संपर्क साधला. परंतु प्रेमराज तिथेही पोचलेला नसल्याचे आढळून आले.

पाण्यावर तरंगताना काही दिसले
गुरुवारी पहाटेच्या सुमारास वाघळी गावातील काही लोक केटीवेअरकडे शौचास जात असतांना पाण्यावर काही तरंगताना आढळून आले. जवळ जावून पाहिले असता प्रेमराज याचे प्रेत पाण्यावर तरंगतांना दिसले. नागरीकांनी घटनास्थळी धाव घेऊन त्याचे प्रेत पाण्यातून बाहेर काढले. शौचास जात असतांना केटीवेअरच्या खडकावरील शेवाळावरून त्याचा पाय घसरून तो पाण्याच्या डोहात पडून बुडून मयत झाला असावा अशी शक्‍यता वर्तविली जात आहे. याप्रकरणी संदीप हिरामण पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news chalisgaon child death ketiware bandhara