चाळीसगावात भररस्‍त्‍यावर गोळीबार; एक जण जखमी

दीपक कच्छवा
Saturday, 28 November 2020

चाळीसगाव शहरातील हुडको कॉलनी परिसरात झालेल्या गोळीबाराची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड व त्यांच्या पथकाने घटनास्थळावर जाऊन पाहणी करत पुढील कारवाईसाठी हालचाली सुरू केल्या.

मेहुणबारे (जळगाव) : चाळीसगाव शहरातील घाट रोड परिसरातील हुडको भागात आज सायंकाळी सव्वाचार वाजेच्या सुमारास मोटार सायकलवरून आलेल्या दोघा अज्ञातांनी शेख जुबेर उर्फ साबीर उर्फ बंबईया (वय 25) याच्यावर गोळीबार केला. हल्लेखोरांनी तीन गोळ्या झाडल्या असून एक गोळी हवेत फायर झाली. तर दुसरी जमिनीवर फायर झाली आणि तिसरी गोळी शेख जुबेर याच्या मांडीला लागली असून तो गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी शहरातील देवरे हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आला आहे. अंतर्गत वादातून हा गोळीबार झाल्याचे वृत्त आहे. 
 
चाळीसगाव शहरातील हुडको कॉलनी परिसरात झालेल्या गोळीबाराची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड व त्यांच्या पथकाने घटनास्थळावर जाऊन पाहणी करत पुढील कारवाईसाठी हालचाली सुरू केल्या. शहरात नाकाबंदी करून हल्लेखोरांच्या शोधार्थ पथके रवाना केली आहेत. 

परिसरात खळबळ
भरदिवसा चाळीसगाव शहरात गजबजलेल्या वस्तीत घडलेल्या प्रकाराने शहरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे दहा दिवसांपूर्वीच नागदरोड झोपडपट्टी भागात पोलीसांनी गावठी पिस्तुलसह तीन जीवंत काडतुसे जप्त केली होती. यावेळी एकास अटक करण्यात आली होती; तर दुसरा साथीदार पळून गेला होता. त्यानंतर आता शहरात चक्क गोळीबार झाल्याने खळबळ उडाली आहे.

नशीब म्‍हणून वाचला
येथील शेख जुबरे उर्फ साबीर उर्फ बंबईया दुपारी 4.15 वाजेच्या सुमारास हुडको भागातून जात असतांना एका यामाहा मोटारसायकलवरून आलेल्या दोघा हल्लेखोरांनी गावठी कट्ट्यातून जुबेर याच्यावर गोळ्या झाडल्या. त्यापैकी एक गोळी त्यांच्या मांडीत घुसली. या हल्ल्यानंतर हल्लेखोर दुचाकीवरून पळून गेले. गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या जुबेर यास शहरातील देवरे हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. हा हल्ल्ला कोणी केला? का केला हे समजून आले नव्हते. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. शहरात प्रथमच थरारक गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

शहरात सापडला होता गावठी कट्टा
शहरातील घाटरोड परिसरात भागात नगरपालीका शॉपिंग कॉम्पलेक्सजवळ (ता.18) नोव्हेंबर रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास सहाय्यक निरीक्षक निसार सय्यद व त्यांच्या सहकाऱ्यांनी अचानक छापा टाकून चांद सलीम सैय्यद (23) यास पकडले होते. तर दानिश अस्लम शेख (27) हा पळून गेला होता. चांद सैय्यदकडून गावठी बनावटीचा कट्टा व तीन जीवंत काडतुसे जप्त केली होती. हा कट्टा कुठून आला? कट्टा विकणारी टोळी कार्यरत आहे काय? कुणाचा गेम करण्यासाठी कट्टा आणला काय? असे अनेक प्रश्न निर्माण झाले असतांनाच शहरात  आज सायंकाळी गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news chalisgaon city road gun firing one parasion injured