बालकाने एक नव्हे तीन नाणी गिळली, तरी वाचले त्याचे प्राण !  

दिपक कच्छवा
Thursday, 8 October 2020

नाणी या बालकाच्या घशातच अडकली. त्यामुळे त्याला खाणे-पिणे अशक्य झाले आणि अचानक त्याची प्रकृती खालावली.

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : खेळता खेळता नऊ वर्षाच्या बालकाने चक्क तीन नाणी तोंडात गिळली. एकदम तीन नाणी पोटात गेल्याने त्याचा श्वासच कोंडला गेला. त्याचे खाणे- पिणे बंद होऊन प्रकृती बिघडली. या बालकाचा जीव धोक्यात आला. त्याला चाळीसगाव शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करून या बालकाचे प्राण वाचविण्यात आले. बालकाची प्रकृती आता स्थिर आहे. 

आवजून वाचा- आगीत भस्म झालेले स्टुडिओ माणुसकीतून उभा राहणार 
 

कन्नड तालुक्यातील नऊ वर्षांचा बालक खेळत असताना त्याने आई-वडिलांच्या नकळत तीन नाणी गिळली. त्यात दोन रुपयांचे दोन व एक रुपयांचे एक अशी तीन नाणी होती. ही नाणी या बालकाच्या घशातच अडकली. त्यामुळे त्याला खाणे-पिणे अशक्य झाले आणि अचानक त्याची प्रकृती खालावली. या मुलाच्या पालकांनी उपचारासाठी तत्काळ चाळीसगाव गाठून (ता. ६) राखुंडे हॉस्पीटलमध्ये दाखल केले. डॉ.अभिजित राखुंडे यांनी बालकास तपासले असता त्याच्या घशात अडकलेली नाणी निदर्शनास आली. तेव्हा डॉ. राखुंडे यांनी त्याला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन भूलतज्ज्ञ डॉ. कुणाल तलरेजा यांच्या सहकार्याने हे अवघड आव्हान स्वीकारून तिन्ही नाणी बाहेर काढून बाळाला त्रासातून मुक्त केले. यामुळे डॉक्टरांंसह बालकाच्या कुटुंबीयांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला. सध्या बाळाची प्रकृती स्थिर असून, सुधारत आहे. याकामी डॉ. राखुंडे यांना बालरोगतज्ज्ञ डॉ. सौरभ अरकडी यांचे विशेष सहकार्य लाभले. 

वाचा- ‘ट्रिपल टी’ त्रिसुत्रामूळे जळगाव जिल्ह्यात कोरोना ‘कंट्रोल’आला मध्ये 
 

बालकाच्या घशात एक नव्हे तीन नाणी गेल्याने परिस्थिती अवघड होती. बालकाचे प्राण वाचवणे गरजेचे होते. मात्र, सहकाऱ्यांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद यामुळेच मला शक्य झाले असून, भविष्यातही माझ्याकडून समाजाची सेवा घडावी अशी भावना डॉ. राखुंडे यांनी व्यक्त केली.  

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news chalisgaon coin swallowed by the child doctor successfully operated and saved the child's life