हृदयद्रावक..पिता- पुत्राच्या मृत्‍यू गाव सुन्न

दीपक कच्छवा
Monday, 26 October 2020

ट्रकने मोटारसायकलला जोरदार धडक दिली. धडक इतकी जबर होती, की मोटारसायकलवरील सतीष राठोड व त्यांचा मुलगा राकेश हे दोघेही रस्त्यावर फेकले गेले.

मेहुणबारे (चाळीसगाव) : शेतात दुचाकीने जात असतांना भरधाव ट्रकने या धडक दिल्याने वडिल व मुलाचा जागीच मृत्यु झाला. या दुर्देवी घटनेने करगाव तांडा नं २ (ता.चाळीसगाव) शोककळा पसरली. दोघांवर एकाच वेळी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. ट्रक चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

करगाव तांडा नं. 2 येथील शेतकरी सतीश मिठू राठोड (वय ५७) व त्यांचा मुलगा राकेश राठोड (वय २५) हे दोघे रात्री चाळीसगाव- धुळे रोडवरील भोरस शिवारातील शेतात मोटारसायकलने जात असतांना भोरस फाट्याजवळ (एमएच.05 के.9681) या ट्रकने मोटारसायकलला जोरदार धडक दिली. धडक इतकी जबर होती, की मोटारसायकलवरील सतीष राठोड व त्यांचा मुलगा राकेश हे दोघेही रस्त्यावर फेकले गेले. त्यात त्यांना जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यु झाला. ट्रक चालक अपघाताची खबर न देताच ट्रक सोडून पळून गेला. याप्रकरणी गोकूळ मिठू राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला ट्रक चालकाच्या (नाव गाव माहित नाही) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक अभिजीत लांडे हे करीत आहेत.

गाव झाले सुन्न
सदर अपघाताची माहिती करगावला कळताच नागरीकांनी अपघातस्थळी धाव घेतली. दसऱ्याच्या आदल्या रात्रीच काळाने वडिल मुलावर काळाचा घाला घातल्याने करगावात शोककळा पसरली. दसऱ्याच्या दिवशीच दोघा पिता पुत्रांवर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. पिता-पुत्राच्या अपघाती निधनामुळे करगावमध्ये दसऱ्याचा सण साजरा झाला नाही.

भोरस चौफुली मृत्युचा सापळा
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ ची गेल्या काही दिवसापासून जीवघेणे खड्डे पडले असल्याने वाहनधारकांना अक्षरशा जीव मुठीत घेऊन वाहन चालवत आहेत. दिवसेंदिवस या मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यातच भोरस फाटा मृत्युचा सापळा ठरत आहे. आतापर्यंत या ठिकाणी शेकडो अपघात झाले असून कित्येकांना प्राण गमवावा लागला आहे. या ठिकाणी भोरस गावकडे व करगाव गावाकडे जाण्यासाठी वाहने वळवतांना वाहनधारकांना अक्षरशा कसरत करावी लागते.

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news chalisgaon dhule road accident father and child dead