जलाशयांमध्ये पूरक साठ्यामुळे...चाळीसगाव तालुका यंदा टँकरमुक्त 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 मे 2020

चाळीसगाव  : दोन वर्षांपूर्वी पावसाने अवकृपा दाखवल्याने उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याच्या टँकरची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली होती. मात्र, मागील वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने सर्व जलाशयांमध्ये पूरक साठा असल्याने यंदा तालुक्यात पिण्याच्या पाण्याच्या टँकरची मागणीच झाली नाही. यामुळे चाळीसगाव तालुका यंदा टँकरमुक्त झाला आहे. 

नक्की वाचा : देशभरातील ४१ आयुध निर्माणीतून ८२ हजार कर्मचाऱ्यांनी ‘लंच बॉयकॉट’

महाराष्ट्रासह अन्य काही राज्यांमध्ये दोन- तीन वर्षांपासून पावसाची अवकृपा होती. यामुळे शेतीसाठी पाणी मिळालेच नाही. परंतु पिण्यासाठीही नागरिकांना भटकंती करावी लागली. आडात नसेल तर पोहऱ्यात कुठून येणार, या उक्तीप्रमाणे नदी, नाले, विहिरी, तलाव, बंधारे यांसह सर्व जलाशये देखील कोरडीठाक होती. समाधानकारक पाऊस नसल्याने पिण्याच्या पाण्याची वानवा भासत नागरिकांसह जनावरांचे पाण्यासाठी हाल झाले होते. पाऊस नसल्याने मागील वर्षी तालुक्यात जवळपास ३९ गावांना ४६ टँकरद्वारे शासनाकडून पाणीपुरवठा करण्यात येत होता. तसेच अनेक महत्त्वाच्या गावांमध्ये शासनाकडून विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या होत्या. टँकरद्वारे पाणीपुरवठा तसेच विहिरी अधिग्रहित करून पाणीटंचाईवर मात करण्याचा प्रयत्न करण्यात आला. भीषण पाणीटंचाई असल्याने नागरिकांना रात्ररात्रभर पाण्याच्या टँकरची वाट पाहावी लागत होती. परंतु गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने तालुक्यातील जलाशये पूर्ण भरलेली आहेत. गिरणा धरण देखील शंभर टक्के भरल्याने या वर्षी आवर्तन सोडण्यात आले. नदी, नाले, विहिरींमध्ये सध्या मुबलक पाणी असल्याने नागरिकांना यंदा पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची गरज पडली नाही. ज्यामुळे टँकरची मागणीच झाली नाही. यंदा चाळीसगाव तालुक्यात केवळ दोनच ठिकाणी विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. जमिनीतही मुबलक पाणी असल्याने हातपंप देखभाल दुरुस्तीचे काम वर्षभर शासनाकडून सुरू ठेवण्यात आले आहे. 

क्‍लिक कराः  अमळनेर पालिकेच्या दवाखान्या समोर आगंणवाडी सेविकांचा ठिय्या ! 
 

दोनच गावांत विहीर अधिग्रहित 
मागील वर्षी तालुक्यात पिण्याच्या पाण्यासाठी शासनाकडून तब्बल २७ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या होत्या. यंदा मात्र मुबलक पाणी असल्याने केवळ जुनपाणी व चत्रभूज तांडा या दोनच गावांत विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. तालुक्यातील केवळ राजदेहरे, तुका नाईक तांडा, शिवापूर व गुजरदरी या भागात विहिरी अधिग्रहित करण्याची मागणी आली आहे. 

आर्वजून वाचा  : संकट आले...खानदेशात येथे झालाय टोळधाडीचा प्रवेश 
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news chalisgaon Due to supplementary stocks in reservoirs tanker free this year