esakal | गौताळा अभयारण्यात वाघाचा मुक्काम; वन विभागाच्या ट्रॅप कॅमेऱ्यात कैद !

बोलून बातमी शोधा

tiger
गौताळा अभयारण्यात वाघाचा मुक्काम; वन विभागाच्या ट्रॅप कॅमेऱ्यात कैद !
sakal_logo
By
आनंन शिंपी

चाळीसगाव ः चाळीसगाव व कन्नड तालुक्याच्या सीमेवरील गौताळा अभयारण्यात गेल्या काही दिवसांपासून पट्टेदार वाघाने मुक्काम ठोकला आहे. या वाघाने जंगलात एका निलगायीचा फडशा पाडल्याचे देखील समोर आले आहे. वन विभागाने ठिकठिकाणी लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात वाघाच्या हालचाली टिपल्या जात असून जंगलात ठिकठिकाणी त्याच्या पंज्याचे ठसे, विष्ठा आढळून आल्या आहेत. दरम्यान, हा वाघ साधारणतः तीन वर्षांचा असून त्याच्या सर्व हालचालींवर वन विभागाकडून बारीक नजर ठेवली जात असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले.

हेही वाचा: आजारी व्यक्तींनी घरी थांबू नका..वेळीच तपासणी करा !

चाळीसगाव- औरंगाबाद रस्त्यावरील कन्नड घाटाचा समावेश असलेल्या गौताळा अभयारण्यात बिबट्या, काळवीट, निलगायी, सायाळ यासह इतरही अनेक वन्यप्राण्यांचा रहिवास आहे. सुमारे २६० चौरम किलोमीटर क्षेत्रात पसरलेल्या या अभयारण्यात दाखल झालेला वाघ हा सुमारे दोन महिन्यांपासून प्रवास करीत आला आहे. पांढरकवडा, नांदेड, किनवट, परभणी, जालना, अजिंठामार्गे गौताळा अभयारण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी वन कर्मचाऱ्यांना या वाघाच्या पाऊलखुणा आढळून आल्या होत्या. त्यांची तपासणी केली असता, ते वाघाच्या पायाचे ठसे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर वन विभागाच्या ट्रॅप कॅमेऱ्यातही हा वाघ कैद झाला. शिवाय जंगलात त्याची विष्ठाही आढळून आली. हा वाघ विदर्भातील टिपेश्वर अभयारण्यातून शेकडो किलोमीटरचा प्रवास करुन आल्याचे वन विभागाच्या अधिकृत सूत्रांकडून सांगण्यात आले.

हेही वाचा: धक्कादायक : परिचारिकांनी लशींची केली चोरी; रंगेहाथ नागरिकांनी पकडले !

गौताळा अभयारण्यात यापूर्वी १९४० व १९७० मध्ये पट्टेदार वाघाचे दर्शन झाले होते. त्यानंतर तब्बल ५० वर्षांनंतर पहिल्यांदाच गौताळ्यात वाघ आढळून आला. तो या भागात यवतमाळच्या पांढरकवडा टिपेश्वर अभयारण्यातून फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात दाखल झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. गौताळा जंगलात वन विभागाने पाच ट्रॅप कॅमेरे बसवले असून १५ मार्चला एका कॅमेर्यात तो टिपला गेला. गौताळा अभयारण्यात वाढलेले गवत आणि ठिकठिकाणी असलेल्या कृत्रिम पाणवठ्यांमुळे वाघाला मोठ्या प्रमाणावर शिकार मिळत आहे. जंगलातील जामदरा, चंदननाला, गौतम ऋषी आश्रम परिसर व सीता न्हाणी या ठिकाणी वाघाच्या पाऊलखुणा आणि विष्ठा आढळून आली. जामदरा परिसरात वाघाने निलगायीचा फडशा फाडल्याचे आढळून आले.