ते दृश्‍य पाहून शेतकरी बेशुद्ध; लाखोचे आद्रक पाण्यात

राजेश सोनवणे
Monday, 7 September 2020

सततच्या पावसाने शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. अशा पावसात देखील शेतातून पिकविलेला माल काढून मार्केटमध्ये नेण्यासाठी घरी नेला जात होता. परंतु नदीत ट्रक्‍टर पलटले अन्‌ क्षणार्धात लाखोचा माल पाण्यात वाहून गेला. हे पाहून शेतकरी बेशुद्ध होवून जमिनीवर कोसळला.

चाळीसगाव : मसाल्‍याच्या भाजीत आवर्जुन वापरले जाणारे अद्रक सध्या भाव खात आहे. बाजारात घ्‍यायला गेले तर तीस- चाळीस रूपये छटाक दराने मिळते. अशात शेतात पक्‍का झालेला मालाची काढणी करून ट्रॅक्‍टर भरून मार्केटमध्ये नेण्याची तयारी असताना साधारण एक- सव्वा क्विंटलचा माल नदीत वाहून गेल्‍याने लाखो रूपयांचे नुकसान शेतकऱ्याचे झाले आहे. 
जामडी (ता. चाळीसगाव) येथील शेतकरी शिवदास जाधव यांची (हिवरखेडा, ता. कन्नड) शिवारात शेती आहे. नुकत्याच झालेल्या सततच्या पावसामुळे गावाजवळच्या नदीला पाणी आले होते. शेत शिवारातून पाणी वाहत होते. यामुळे शेतात जाण्याचा रस्‍ता देखील बंद झाला होता. अशा स्‍थितीत शेतकरी शिवदास जाधव यांनी शेतात मजूर लावून आद्रक काढले व ट्रॅक्टरमध्ये भरून बाजारात जाण्यासाठी ते निघाले. मात्र रस्ता खराब असल्याने गावालगत वाहणाऱ्या नदीच्या पाण्यात आद्रकने भरलेला ट्रॅक्टर उलटला. मोठ्या कष्टाने कमावलेल्या आद्रक वाहून गेल्याने शेतकरी जाधव हे जागेवर बेशुद्ध झाले होते. हा शेतरस्ता दुरुस्तीची मागणी वारंवार करूनही अद्याप दुरुस्ती न झाल्याने ट्रॅक्टर उलटला. सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही. मात्र, हजारो रुपयांचे नुकसान झाले.

अन्‌ स्वखर्चातून बनविला शेतरस्ता
पाऊस भरपूर पडत असल्याने नद्या-नाले ओसंडून वाहत आहेत. यामुळे नदीच्या गावाच्या शेतकऱ्यांना नदी-नाले ओलांडून आपला तयार झालेला शेतमाल बाजारात नेण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. अशात शेतकरी शिवदास जाधव यांचा आद्रकने भरलेला ट्रॅक्टर रस्ता खराब असल्याने नदीच्या पाण्यात उलटला होता. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि आपल्‍याही मालाचे नुकसान होवू शकते अशी भिती शेतकऱ्यांमध्ये होती. यातूनच जामडी (ता. चाळीसगाव) येथील शेतकरी दिपकसिंग राजपूत. भगवान परदेशी अरुण जाधव अनिल जाधव राजु परदेशी, सरदार परदेशी यांनी शेतामध्ये जाण्यासाठी नदी सोडून जवळपास दीड किलोमीटर अंतराचा शेत रस्ता स्वखर्चातून बनविला. यामुळे आता या शेतकऱ्यांना आपला शेतातील माल केळी टमाटा, अद्रक इतर जो काय असेल तो सुरक्षितपणे शेतातून बाहेर आणून बाजारात विकायला नेता येणार आहे कुठल्याही शासकीय मदतीची किंवा निधीची वाट न पाहता तयार केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news chalisgaon ginger tractor reversed in river