गिरणा धरणातील मृत माशांचा झाला उलगडा; पाणी पुरवठा झाला सुरु

girna dam
girna dam

मेहुणबारे (जळगाव) : गिरणा धरणाच्या गिरणा पपिंग स्टेशनच्या जॅकवेलसमोर परवा रात्री सुमारे चारशे ते पाचशे किलो मृत मासे आढळून आले होते. त्यामुळे मालेगाव, चाळीसगाव पालीकांसह अन्य गावांचा पाणी उपसा तात्काळ थांबविण्यात आला होता. मात्र गिरणा धरणावरील स्थिती पूर्ववत झाल्याने थांबवेला पाणी उपसा आज पहाटे तीनच्या सुमारास सुरळीत करण्यात आल्याने शहरात काही भागात पाणी पुरवठा करण्यात आला. उद्यापासून शहरात सुरळीत पाणी पुरवठा होईल अशी माहिती नगरपालीकेचे मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी दिली.

गुरुवारी रात्री बाराच्या सुमारास गिरणा धरणावरील पपिंग स्टेशनवरील दोघा कर्मचाऱ्यांना जॅकवेलजवळ मोठ्या प्रमाणावर मृत मासे तरंगतांना दिसून आले होते. पहिल्यांदाच असा प्रकार समोर आल्याने या घटनेची माहिती पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यंना देण्यात आली. घटनास्थळी चारशे ते पाचशे किलो मृत मासे आढळून आले. त्यानंतर मालेगाव शहरासह चाळीसगाव नगरपालीका, दहिवाळसह २६ गावांचा पाणी पुरवठा योजनांचा पाणी पुरवठा रोखण्यात आला होता. त्यामुळे चाळीसगाव शहरातील पाणी पुरवठा शुक्रवारी होवू शकला नव्हता. शुक्रवारी सायंकळी नगरपालीकेचे मुख्याधिकारी शंकर गोरे, पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी दिनेश जाधव यांनी गिरणा डॅमची पाहणी करून पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. रात्री बाराच्या सुमारास मालेगाव महानगरपालीकेच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली; तेव्हा त्या ठिकाणी धरणाच्या जलाशयात मासे पोहतांना दिसून आल्याने पाणी पिण्यालायक असल्‍याचा निष्कर्ष काढण्यात आल्याने आज पहाटे तीन वाजेच्या सुमारास पंपिंग स्टेशनला पाणी पुरवठा सुरळीत करण्यात आला. गिरणा धरणावरील स्थिती आता सामान्य आहे. 

अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा 
दरम्यान गिरणा धरणात मृत मासे आढळून आल्याने शुक्रवारी एकच खळबळ उडाली होती. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाव घेत मासेमारीचा ठेका घेतलेल्या कंपनीला मृत मासे पाण्याबाहेर काढून मोठ्या खड्ड्यात बुजवण्याचे निर्देश देण्यात आले होते. गिरणा धरणाची पाणी पातळी क्षमता २१ हजार ५९९ दलघफु इतकी असून एवढ्या मोठ्या जलाशयात खोलवर मासे पकडणे शक्‍य नसल्याने काही उपद्रवी लोकांकडून मासे पकडण्यासाठी विषारी द्रवाचा वापर केला असावा; त्यात मासे मृत झाल्‍याचे बोलले जात आहे. जेथे मृत मासे आढळून आले तेथील पाण्याचे नमुने घेऊन शुक्रवारीच नाशिक व मुंबई येथे पाठविले होते. त्याचा अहवाल आज सायंकाळपर्यंत आला नव्हता. मृत मासे आढळून आल्याप्रकरणी मासेमारीचा ठेका घेतलेल्या कंपनीने दिलेल्या तक्रारीवरून मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे समजते. कृषी मंत्री दादा भुसे यांनी शुक्रवारी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मासेमारी करणाऱ्या ठेकेदारासह तेथे कर्तव्यास असणाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश दिले होते.

संपादन ः राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com