अरे बापरे.. गिरणा धरणात तडफडत मरताय मासे; १५८ गावांचा पाणी पुरवठा थांबविला

दीपक कच्छवा
Friday, 16 October 2020

गिरणा धरणाजवळील जलाशयात एका मच्छीमारास मृत मासे पाण्यावर तरंगताना आढळले. तब्बल ९० ते १०० किलो मासे मृतावस्थेत, तर काही मासे तडफडताना आढळले.

मेहुणबारे (जळगाव) : गिरणा धरणातील जलाशयात गुरुवारी (ता. १५) उशिरा तब्बल ९० ते १०० किलो मृत मासे पाण्यावर तरंगताना आढळल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. धरणातील पाण्याचे नमुने घेऊन ते नाशिक येथे पाठविले आहेत. माशांचा मृत्यू कशामुळे झाला हे समजेपर्यंत धरणावर पिण्याच्या पाण्यासाठी अवलंबून असलेल्या मालेगाव महापालिका, चाळीसगाव व अन्य चार पालिका, दहिवाळ इतर अशा सुमारे १५८ गावांतील पाणीपुरवठा योजनांचा पंपिंग स्टेशनचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. गिरणा पाटबंधारे विभागाने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 
नाशिकसह निम्म्या जळगाव जिल्ह्याचे शेती व पाण्याचे प्रश्न सोडविणारे धरण यंदा सलग दुसऱ्या वर्षी शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे या धरण परिसरात मासेमारीला सुगीचे दिवस आले आहेत. रात्री उशिरा एकच्या सुमारास गिरणा धरणाजवळील जलाशयात एका मच्छीमारास मृत मासे पाण्यावर तरंगताना आढळले. तब्बल ९० ते १०० किलो मासे मृतावस्थेत, तर काही मासे तडफडताना आढळले. ही माहिती मासे पकडणाऱ्याने तेवढ्या रात्री लगेचच पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. 

पाण्याचे नमुने घेतले
गिरणा धरणावर अधिकाऱ्यांनी शुक्रवारी (ता. १६) सकाळी भेट दिली. या ठिकाणी गिरणा पाटबंधारे विभागाचे उपअभियंता हेमंत पाटील, शाखा अभियंता एस. आर. पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. या जलाशयाच्या पाण्याचे नमुने संबंधित अधिकाऱ्यांनी घेतले असून, ते नाशिक येथील शासकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. या पाण्याचा तपासणी अहवाल आल्यानंतर सर्व सुरळीत होईल, असे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतरच या जलाशयातील माशांचा मृत्यू कशामुळे झाला हे समजणार आहे. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणावर मासे मृत आढळल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. 
 
जलाशयातील मृत पावलेल्या माशांचा मृत्यू कोणत्या कारणाने झाला यासाठी पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत. तपासणी आहवाल आल्यावर पाणीयोजनेचा पुरवठा लवकरच सुरळीत होईल. 

- हेमंत पाटील, उपअभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news chalisgaon girna river dam fish dead and water supply close