गिरणाचे पाणी शेतकऱ्यांच्या डोळ्यातून; पाण्यात तरंगू लागले पिके

दीपक कच्छवा
Sunday, 20 September 2020

बंधाऱ्यावरील पाणी पाहण्यासाठी आजुबाजूच्या ग्रामस्थांनी एकच गर्दी केली होती. पुराच्या पाण्याने अनेकांची शेती पाण्याखाली आली व यामुळे पिकांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

मेहुणबारे (जळगाव) : गिरणा धरणातून आलेल्या पाण्यामुळे जामदा बंधाऱ्यातुन मोठ्याप्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु आहे. गिरणा काठालगत असलेल्या अनेकांच्या शेतातील पिकांमध्ये पाणी घुसले; तर काही ठिकाणी पीक वाहुन गेले. यामुळे केळी, मका, कापूस पिक पुर्ण उध्वस्त झाले आहे. वडगाव(ता. चाळीसगाव) भागातील शेतातील पिके वाहुन गेली, तर काहीच शेतात पडलेला मका पाण्यात तरंगत होता. वरखेडे खुर्द येथे पुराच्या पाण्याने ऊसाचे नुकसान झाले आहे.

जामदा (ता.चाळीसगाव) येथील बंधारा शंभर टक्के भरले असुन या बंधाऱ्यात गिरणा धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी येत आहे. या बंधाऱ्यावर गेट आँपरेटर अनिल परदेशी व सुनिल परदेशी लक्ष ठेवून आहेत. या बंधाऱ्यावरील पाणी पाहण्यासाठी आजुबाजूच्या ग्रामस्थांनी एकच गर्दी केली होती. पुराच्या पाण्याने अनेकांची शेती पाण्याखाली आली व यामुळे पिकांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

वडगाव लांबे येथे केळी पाण्यात 
वडगावलांबे (ता.चाळीसगाव) या भागातील अनेक शेतकऱ्यांचा मक्का वाहुन गेला. गवालगत असलेल्या नाल्याला पूर आल्याने या पुराचे पाणी शेतात घुसल्याने आतोनात नुकसान झाले आहे. येथील वयोवृद्ध शेतकरी सुदाम कुलकर्णी यांची तब्बल चार एकर केळी पाण्याखाली आल्याने आतोनात नुकसान झाले आहे. कपाशी, ऊस यांच्या शेतात पाणी शिरल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. वडगाव येथे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या संख्येने नुकसान झाले आहे. प्रशासनाने पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे. रहीपुरी(ता.चाळीसगाव) भागात अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी घुसल्याने पिके पाण्याखाली गेली आहेत. ज्या काही शेतकऱ्यांचे कपाशी पिकाचे बोंडे काळी मक्‍याची कणसे व जनावरांना मिळणारा मक्‍याचा चारा पाहून शेतकऱ्यांचे डोळे पाणावत आहेत.

वरखेडे खुर्द येथेही नुकसान  
वरखेडे खुर्द (ता.चाळीसगाव) येथे गिरणापात्रातील आलेल्या पुराचे पाणी ऊसाच्या शेतात गेल्याने ऊसाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मोठ्या कष्टाने फुलवलेल्या शेत शिवारावर जणू अस्मानी संकटच कोसळले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास होत असलेल्या मुसळधार पावसामुळे हिरावला गेल्याने वरखेडे, तिरपोळे, दरेगाव, मेहुणबारे या भागात कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. नगदी पीक हातचे गेल्यामुळे ग्रामीण अर्थकारणावर गंभीर परिणाम जाणवत आहे. यामुळे बळीराजा हताश झाल्याचे चित्र दिसत आहे.

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news chalisgaon girna river water in farm