देवदर्शनासाठी दुचाकीवर निघाले... अन्‌ अपघातात नववधू ठार !

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

भीषण अपघातात अंजुमन बी तालीम खान या नववधूच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

चाळीसगाव :  ट्रकची दुचाकीला जोरदार धडक लागून झालेल्या अपघातात नववधू ठार झाली तर पती गंभीर जखमी झाल्याची घटना औरंगाबाद- सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ वरील कन्नड घाटात आज दुपारी दीडच्या सुमारास घडली. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, चाळीसगाव शहरातील हुडको कॉलनीतील रहिवासी तालीम खान सादिक खान यांचे काही दिवसांपूर्वी लग्न झाले होते. ते आपल्या पत्नीसोबत दुचाकीने (एम. एच, १९, डी २९७०) देवदर्शनासाठी जात होते. कन्नड घाटातून जात असताना यु टर्नजवळ औरंगाबादकडून चाळीसगावकडे येणाऱ्या ट्रकची (एनएल ०१, एच ४३६०) दुचाकीला जोरदार धडक बसली. या भीषण अपघातात अंजुमन बी तालीम खान या नववधूच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचे पती तालीम खान सादिक खान यांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत असून याप्रकरणी जावेद अली सय्यद अहमद अली यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रक चालकाविरुद्ध चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार राजेंद्र साळुंखे तपास करीत आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news chalisgaon In a Kannada Ghats truck and twowiilar accident lady deth