मुलगा हुतात्‍मा झाला..आईची नजर अंतिम दर्शनाच्या वाटेकडे

martyred terrorist attack
martyred terrorist attack

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) : देशाच्या मूळावर उठलेल्या क्रूर अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात पिंपळगाव (ता.चाळीसगाव) येथील अवघा 21 वर्षाचा जवान यश देशमुख भारत मातेचे रक्षण करतांना हुतात्मा झाला. गुरुवारी सायंकाळी यश अतिरेक्यांशी लढतांना शहीद झाल्याची बातमी गावात धडकताच गावकऱ्यांचा काळजाचा ठोकाच चुकला. आताशी कुठे जीवनाची सुरूवात करणाऱ्या आणि देशसेवेचे मोठे स्वप्न घेऊन काश्मिमध्ये तैनात असलेल्या यशचे असे अचानक जाण्याने गावकरी सुन्न झाले आहेत.

गावातील देशसेवेत यश देशमुख लागला असताना हुतात्मा झाला आणि संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले आहे. सिमेवर लढणाऱ्या जवानांचा हकनाक बळी घेणाऱ्या अतिरेक्यांचा सरकारने बिमोड करावा; अशी संतप्त प्रतिक्रिया गावकऱ्यांनी या दुखद घटनेप्रसंगी व्यक्त केली. शहीद जवानाच्या पार्थिवाकडे कुटुंबासह गावकरी आस लावून बसले आहेत. शहीद जवानाचे पार्थिव उद्या (ता.२८) औरंगाबादहून चाळीसगाव येथे सकाळी येणार असून दहाच्या सुमारास घोडेगाव रस्त्यावर मोकळ्या पटांगणावर जवानाला शासकीय इतमामात अखेरचा निरोप दिला जाणार आहे. अंत्यंस्काराची तालुका प्रशासनाकडून तयारी सुरु झाली आहे.

आईला धक्का
यश देशमुख हे अकरा महिन्यांपूर्वी पुणे येथे सैन्य दलात पॅरा कंमाडो म्हणून भरती झाले होते. नऊ महिन्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून ते दोन महिन्यांपूर्वीच श्रीनगर येथे रूजू झाले होते. यश यांच्या मृत्यूची बातमी मिळताच त्यांच्या आईला धक्का बसला व त्या बेशुद्ध झाल्या. यश यांच्या पश्चात आई, वडील, एक लहान भाऊ व दोन बहिणी असा परिवार आहे. 

आई- बाबा तुम्‍ही कसे अहात
यश यांचे वडील शेतकरी असून, लहान भावाचे बारावीचे शिक्षण झाले आहे. यश हे अत्यंत कुटुंबवत्सल व मनमिळावू होते. घराची जबाबदारी असल्याने सवड झाली की सतत आई- वडिलांना फोन करून खुशाली विचारायचे. गावातले मित्र, शेजारी व परिचितांनाही फोन करून चौकशी करायचे. दोनच दिवसांपूर्वीच त्यांनी घरी फोन करून तब्येतीची विचारपूस केली होती. हा त्यांचा कुटुंबीयांशी शेवटचा संवाद होता. 

गाव बुडाले शोकसागरात
यश देशमुख यांच्या बलीदानाने अवघे गाव शोकसागरात बुडाले आहे.काल सायंकाळी गावात ही माहिती मिळाल्यापासून अख्खे गाव शोकसागरात बुडाले. रात्री गावाचा डोळ्याला डोळा लागला नाही. गावकऱ्यांनी रात्र जागून काढली.यश यशचे पार्थिव उद्या शनिवारी सकाळी येण्याची श्नयता आहे.तालुका प्रशासनाने त्या दृष्टीने तयारी चालवली आहे. उपविभागीय अधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, तहसीलदार अमोल मोरे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व पोलीस दलाच्या अधिकाऱ्यांनी पिंपळगाव येथे भेट देवून शहीद जवान यांच्या कुटुबियांचे सांत्वन केले. आमदार मंगेश चव्हाण यांनी भेट देवून देशमुख कुटुंबियांचे सांत्वन केले. 

पार्थिवाची आस
गावकऱ्यांना आता शहीद जवानाच्या पार्थिवाची आस लागली आहे. त्यादृष्टीने तयारी सुरू आहे. गावापासून जवळ असलेल्या घोडेगाव रस्त्यावर मोकळ्या पटांगणावर शहीद जवानाला सकाळी दहाला यशला अखेरचा निरोप दिला जाणार असल्‍याची माहिती उपविभागीय अधिकारी लक्ष्मीकांत साताळकर यांनी दिली.

अखेरचा निरोप देण्यासाठी...
गावाचा सुपुत्र देशाचे रक्षण करतांना शहीद झाल्याचे दु:ख गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर असले; तरी अखेरचा आपल्या लाडक्‍या सुपुत्राला अखेरचा निरोप देण्यासाठी गावकरी आस लावून आहेत. गावात ठिकठिकाणी शहीद जवानाना श्रद्धांजली वाहणारे बॅनर लावण्यात आले असून देशभक्तीपर गीतांना गावातील वातावरण धीर गंभीर बनले आहे. अंत्यंसंस्काराप्रसंगी तब्बल 15 क्विंटल झेंडुची फुले मागवण्यात आली आहे. सजवलेल्या ट्रॅ्क्‍टरवरून शहीद जवानाची पार्थिव नेण्यात येणार आहे. गावात प्रत्येक घरासमोर रांगोळ्या टाकण्यात येणार आहे.

चाळीसगाव ते पिंपळगावपर्यंत बॅनर
देशासाठी रक्षण करतांना शहीद झालेले यश देशमुख यांना श्रद्धांजली वाहणारे बॅनर चाळीसगाव शहरात जागोजागी लावण्यात आले आहे.तसेच चाळीसगाव ते पिंपळगाव या 22 किमी दरम्यान दुतर्फा श्रद्धांजलीचे बॅनर लावण्यात येणार आहेत.

गावाच्या विकासाचे स्वप्न राहीले अपूर्ण
शहीद यश देशमुख हे गत वर्षी पूणे येथे सैन्य दलात भरती झाले होते. बेळगाव येथे 9 महिन्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांची श्रीनगर येथे नियुक्ती करण्यात आली होती. या अकरा महिन्यात सहा महिन्याच्या ट्रेनिंगनंतर पहिल्यावेळेस 28 दिवस व दुसऱ्या वेळेस 22 दिवस घरी आले होते. ट्रेनिंग व नियुक्तीदरम्यान ते कुटुंबाशी संवाद साधत तसेच मित्रांशीही संवाद साधतांना गावातील तरुणांसाठी काहीतरी वेगळे करण्याचा मानस बोलून दाखवला होता. गावात वाचनालय सुरु करून तरुणांसाठी स्पर्धा परिक्षा केंद्र सुरु करण्याचा इरादा व्यक्त केले होते. मात्र त्यांचे हे स्वप्नच राहीले.

गावात 4 जवान
पिंपळगाव हे शेतीबहूल गाव आहे. गावात आतापर्यंत चार जण सैन्यात भरती झाले. त्यापैकी एक जवान यापूर्वी सेवानिवृत्त झाला आहे तर उर्वरीत तीन जवान कर्तव्य बजावत होते. त्यापैकी यश देशमुख हे भारत मातेची सेवा बजावतांना शहीद झाले.या घटनेने गाव शोकाकूल झाले आहे.गावाने आपला एक पुत्र देशासाठी दिल्याची भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली. 

संपादन ः राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com