संकट समयी महत्वाची भूमीका बजाविणाऱ्या तेराशे आरोग्यसेविकांचा आमदारांनी केला सन्मान 

आनंन शिंपी
Thursday, 26 November 2020

आरोग्यसेवा हीच ईश्वरसेवा असून, आरोग्यसेवा देणारे देवदूत ठरणार आहेत. तसेच अत्यल्प मानधनावर काम करणाऱ्या या भगिनींच्या प्रलंबित मागण्यांचा शासनाकडे पाठपुरावा करू

चाळीसगाव : कोरोना संसर्ग वाढत असताना आपला जीव धोक्यात घालून आशासेविका, अंगणवाडीसेविका, मदतनीस, आरोग्यसेविका, परिचारिका या भगिनींनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांनी कोरोना काळात केलेल्या कामाची किंमत करता येणार नाही. आज जे कोरोनावर आपण नियंत्रण मिळविले त्यात सर्वांत जास्त योगदान आरोग्यसेविकांचे आहे, असे गौरोद्‍गार आमदार मंगेश चव्हाण यांनी काढले. भाजप व शिवनेरी फाउंडेशनतर्फे आयोजित ‘भाऊबीज’ सोहळ्यात ते बोलत होते. 

 

आवश्य वाचा- अमृत’मुळे साडेपाच लाख जळगावकर वेठीस 

 

आमदार चव्हाण यांच्या संकल्पनेतून घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात कोरोना काळात सेवा देणाऱ्या तालुक्यातील एक हजार ३०० आशा स्वयंसेविका, अंगणवाडीसेविका, मदतनीस, आरोग्यसेविका, परिचारिका यांना आमदार चव्हाण यांच्यातर्फे साडी व मिठाईचे वाटप करण्यात आले. या वेळी कोरोनायोद्धा सन्मानपत्रही देण्यात आले. या कार्यक्रमात आरोग्यसेविकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 

 

प्रलंबित मागण्यांसाठी लढा देऊ 
या वेळी आमदार चव्हाण म्हणाले, की भाजपतर्फे चाळीसगाव तालुक्यातील एक लाख कुटुंबांपर्यंत आर्सेनिक अल्बम गोळ्या वाटपात आशासेविका व अंगणवाडीताईंनी मोलाची मदत केली. कोरोनामुळे नात्यांच्या व्याख्या बदलल्या, अनेक रुग्ण दवाखान्यात दगावले. कुणी कुणाला विचारत नव्हते. जो आपल्या कामात येईल तोच आपला नातेवाईक असेल. पुढील काळात आरोग्यसेवा हीच ईश्वरसेवा असून, आरोग्यसेवा देणारे देवदूत ठरणार आहेत. तसेच अत्यल्प मानधनावर काम करणाऱ्या या भगिनींच्या प्रलंबित मागण्यांचा शासनाकडे पाठपुरावा करू, वेळ पडली तर मंत्रालयासमोर ठिय्या मांडून सरकारशी भांडू, असा इशारादेखील आमदार चव्हाण यांनी दिला. 

सेल्फीसाठी आरोग्यसेविकांची लगबग 
अतिशय भावपूर्ण वातावरणात झालेल्या या कार्यक्रमात आमदार मंगेश चव्हाण यांनी आरोग्यसेविका यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात औक्षण करून घेतले. या वेळी आमदार भाऊ बनून आपल्यात सहभागी झाल्याने आनंदित झालेल्या आरोग्यसेविकांनी आमदार चव्हाण यांना औक्षणाचे नारळ देण्यासाठी व मोबाईलमध्ये सेल्फी काढण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news chalisgaon MLA Mangesh Chavan felicitated health workers