esakal | कष्टाने पिकवले, पण भावच मिळाला नाही; मग काय उतरावे लागले ना रस्त्यावर
sakal

बोलून बातमी शोधा

कष्टाने पिकवले, पण भावच मिळाला नाही; मग काय उतरावे लागले ना रस्त्यावर

मोसंबी बाजारात विकण्याची वेळ आल्यानंतर त्यांनी टेम्पोमध्ये भरला. मात्र, येथील बाजारात या मोसंबीला अवघ्या पंधरा ते वीस रुपये किलोचा भाव मिळाला.

कष्टाने पिकवले, पण भावच मिळाला नाही; मग काय उतरावे लागले ना रस्त्यावर

sakal_logo
By
आनन शिंपी

चाळीसगाव : शेतात दिवसभर राबराब राबून मोठ्या कष्टाने मोसंबीचे पीक घेतले. उत्पादनही चांगले झाले. मात्र, बाजारात व्यापाऱ्यांकडून अपेक्षित भाव मिळत नसल्याने निराश झालेल्या शेतकऱ्याने स्वतः मोसंबीची ग्राहकांना किरकोळ करून होणारे नुकसान टाळण्याचा काहीसा प्रयत्न केला आहे. 

शिंदी (ता. चाळीसगाव) येथील शेतकरी मिलिंद गायकवाड यांची व त्यांच्या मामांची शेती आहे. सुमारे अडीच एकर क्षेत्रावर त्यांनी मोसंबीचे पीक घेतले. मोसंबीच्या रोपांची लागवड केल्यानंतर त्यांची योग्य प्रकारे काळजी घेतली. झाडांना चांगल्या मोसंबीही लागल्या. मोसंबी बाजारात विकण्याची वेळ आल्यानंतर त्यांनी टेम्पोमध्ये भरला. मात्र, येथील बाजारात या मोसंबीला अवघ्या पंधरा ते वीस रुपये किलोचा भाव मिळाला. मोसंबीची लागवड करण्यापासून उत्पादन हाती येईपर्यंत त्यावर झालेला खर्च आणि मिळणारा कमी भाव यात मोठी तफावत आली.

व्यापारी भावच देत नाही

वास्तविक, बाजारात ग्राहकांना ५० ते ८० रुपये किलो दराने मोसंबी विक्री केली जात आहे आणि शेतकऱयांना बाजारात मात्र व्यापारी १५ ते २० रुपयांचा भाव देत होते. त्यामुळे शेतकरी गायकवाड यांनी आपली मोसंबी पिकअप व्हॅनमध्ये भरली आणि शहरातील स्टेशन रोडवरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाशेजारी मोसंबीची विक्री सुरू केली. ५० रुपये किलोप्रमाणे मोसंबीची विक्री सुरू केल्यानंतर ग्राहकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. सुमारे १५ टन मोसंबी अशाच प्रकारे विकण्याचा श्री. गायकवाड यांनी निर्णय घेतला आहे. 

महामार्गावर शेतकऱयांकडून विक्री

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील धुळे ते जळगाव दरम्यान अनेक खेडे तसेच गावांचे शेतकरी आता थेट स्वःता महामार्गावर दुकान लावून मोसंबी विक्री करत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे शेतकऱयांना थेट माल मिळत असल्याने ग्राहकांना तसेच शेतकऱयांना याचा फायदा मिळत आहे.   

बाजारात व्यापारी कमी दराने शेतीमालाची खरेदी करून जादा दराने ग्राहकांना विकतात. त्यामुळे शेतकऱ्यांना मूळ मालक उत्पादित करणाऱ्या शेतकऱ्यांच्या हाती काही येत नाही आणि व्यापाऱ्यांचा मात्र याचा फायदा होतो, म्हणून शेतकऱ्यांनी आपल्या उत्पादित केलेल्या मालाला थोडे कष्ट झाले तरी चालतील. मात्र, बाजारात थेट ग्राहकांपर्यंत विकावा. जेणेकरून आपले होणारे नुकसान टाळता येईल. 
- मिलिंद गायकवाड, शेतकरी, शिंदी (ता. चाळीसगाव)
 

संपादन- भूषण श्रीखंडे
 

loading image