esakal | Jalgaon: पाटणादेवीच्या जंगलात गुराख्याचा खून
sakal

बोलून बातमी शोधा

crime

Jalgaon: पाटणादेवीच्या जंगलात गुराख्याचा खून

sakal_logo
By
आनंन शिंपी


चाळीसगाव ः पाटणादेवी (ता. चाळीसगाव) परिसरातील कळंकी भागातील जंगलात (Patna daevi Forest) गुरांची राखण करणाऱ्या ५० वर्षीय गुराख्याचे (Cowboy) हातपाय बांधून अज्ञात मारेकऱ्यांनी खून (Murder) केल्याची घटना उघडकीस आली. त्यामुळे पाटणादेवी परिरसातील गावांमध्ये एकच खळबळ उडाली.

हेही वाचा: शेतकरीपुत्राची भरारी;‘पीएफ’चे भांडवल अन्‌ तीन कंपन्यांचा मालक

याबाबत माहिती अशी, पाटणादेवीच्या जंगलात गणेशपूर (ता. चाळीसगाव) येथील नाना उर्फ ज्ञानेश्‍वर संतोष पाटील (वय ५०) हे गुरे राखण करण्याचे काम करतात. रविवारपासून (३ ऑक्टोबर) नाना पाटील हे त्यांचे सहकारी सखाराम पाटील यांच्यासोबत जंगलात गुरे राखण्यासाठी गेलेले होते. जंगलात ज्या ठिकाणी ते वास्तव्याला होते, तेथून मंगळवारी ते जंगलात गेले. मात्र, रात्री परतले नाही. दुसऱ्या दिवशी सखाराम पाटील यांनी गणेशपूरला येऊन नाना पाटील यांचा शोध घेण्यासाठी गणेशपूरला आले. मात्र, ते घरी आलेले नसल्याने त्यांच्या मुलांसह इतरांनी त्यांचा जंगलात शोध घेण्याचा प्रयत्न केला असता औरंगाबाद वन विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या ओढरे, वडनेर, कळंकी शिवारालगतच्या जंगलात नाना पाटील यांचा हातपाय बांधलेल्या अवस्थेत मृतदेह मिळून आला.

पोलिसांची घटनास्थळी धाव..

ग्रामीण पोलीसांना या घटनेची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मयत नाना पाटील यांच्या डोक्याच्या मागील बाजूला काही तरी धारदार शस्त्राने वार करुन त्यांना जीवे ठार मारल्याचे दिसून आले. याबाबत नीलेश पाटील याने दिलेल्या फिर्यादीवरुन ग्रामीण पोलीसात अज्ञात मारेकऱ्यांविरुध्द खुनाचा दाखल करण्यात आला आहे. हा खून कोणी व कशासाठी केला हे अद्याप समजू शकले नाही. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे.

हेही वाचा: गुलाल झटकण्यापूर्वीच नवनिर्वाचित सदस्यावर गुन्हा

चंदन तस्करांचा सुळसुळाट

पाटणादेवी जंगलात चंदनासह जंगतील इतर वनसंपदेची चोरी करणाऱ्यांची मोठी संख्या आहे. जंगलाचे क्षेत्रफळ मोठे असल्याने व त्यात वन कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने प्रत्येक भागात संरक्षणाच्या दृष्टीने लक्ष ठेवणे शक्य नाही. त्यामुळे या जंगलात विना परवाना गुरे चराईसह चंदन तस्करी सर्रास सुरू असते. नाना पाटील यांना चंदन तस्करांनी तर ठार मारले नसावे? असा संशय व्यक्त होत असल्याने त्यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

loading image
go to top