गुटखा पकडला, तक्रार दाखल झापी पण मुख्य सूत्रधार पोलिसांना मिळेना ! 

आनंन शिंपी
Wednesday, 28 October 2020

जळगावजवळील जैन हिल्सजवळ ट्रक अडवला. या सर्व घटनेचे सर्व व्हिडिओ आमदार चव्हाण यांनी तयार करून व्हायरल केले होते. त्यानंतर स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने मेहुणबारे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

चाळीसगाव : येथील आमदार मंगेश चव्हाण यांनी ५५ लाखांचा गुटखा पकडून दिला. मात्र, या प्रकरणी जळगावच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात पोलिसांनी एका संशयिताला अटक केली असली, तरी या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार अद्यापही फरारी आहे. त्यामुळे अटकेतील संशयिताला बळीचा बकरा बनवले जात असल्याची चर्चा शहरात सुरू आहे. गुटखा प्रकरणी एकीकडे गुन्हा दाखल झालेला असताना दुसरीकडे मात्र शहरात गुटख्याची सर्रास विक्री सुरू आहे. 

छुप्या मार्गाने राज्यात परप्रांतातून मोठ्या प्रमाणावर गुटखा विक्रीला आणला जातो. दोंडाईचा (जि. धुळे) येथील गुटखा विक्री करणाऱ्या घाऊक व्यापाऱ्याच्या माध्यमातून चाळीसगाव परिसरात मोठ्या प्रमाणावर गुटखा आणला जातो. या व्यवसायात शहरातील एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी गेल्या काही दिवसांपासून उतरला आहे. त्याला राजकीय पाठबळ असल्याने त्याच्या या व्यवसायाकडे पोलिस कानाडोळा करीत आले आहेत. काही दिवसांपूर्वी सुमारे सव्वाशे पोते भरलेला ट्रक धुळे रस्त्याने चाळीसगावकडे येत होता. या ट्रकची माहिती जळगावच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला समजल्यानंतर त्यांच्या पथकाने चाळीसगाव-धुळे रस्त्यावरील तरवाडे बारीजवळ सापळा रचून ट्रक पकडला. ट्रकचालकाने संबंधित मालकाशी संपर्क साधल्यानंतर सुरवातीला तडजोडीचे प्रयत्न झाले. त्यानंतर हा ट्रक स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने वरिष्ठांच्या सूचनेनुसार जळगावला नेण्याचे ठरवले. याच दरम्यान आमदार मंगेश चव्हाण यांना या प्रकाराची माहिती मिळाली व त्यांनी या ट्रकचा पाठलाग करून जळगावजवळील जैन हिल्सजवळ ट्रक अडवला. या सर्व घटनेचे सर्व व्हिडिओ आमदार चव्हाण यांनी तयार करून व्हायरल केले होते. त्यानंतर स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने मेहुणबारे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. मात्र, त्यावर आमदार मंगेश चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा खोटा आहे. कारण आपण पाठलाग करून ट्रक पकडलेला होता, असे सांगून यातील दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली होती. 

उपविभागीय अधिकाऱ्यांकडे चौकशी 
या गुन्ह्याचा तपास करण्याची जबाबदारी येथील उपविभागीय पोलिस अधिकारी कैलास गावडे यांच्यावर जिल्हा पोलिस अधीक्षकांनी सोपवली. त्यानुसार श्री. गावडे यांनी शहरातील गुटखा विक्रेता विजय देवरे याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर सुरवातीला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. सध्या देवरेची जळगावला न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. प्राप्त माहितीनुसार या गुन्ह्यात भारतीय जनता पक्षाचा एक पदाधिकारी असलेल्या गुटखा विक्रेत्याचाही समावेश आहे. मात्र, त्याला पोलिसांनी अटक केली नाही. ज्या वेळी हा ट्रक स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने पकडला त्या वेळी घटनास्थळी हाच पदाधिकारी गेलेला होता. एकीकडे पोलिसांनी लाखोंचा गुटखा पकडून मोठी कारवाई केली आहे. शिवाय शहरातील हॉटेल अन्नपूर्णाजवळील एका गुटखा विक्री करणाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे. या दोन्ही कारवाया ताज्या असतानाही सध्या शहरात गुटख्याची सर्रास विक्री सुरू आहे. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news chalisgaon Police did not find the main facilitator in the gutkha case