जन्मभूमीसह कर्मभूमीत तेवतोय शिक्षणाचा ‘दीपक’; शैक्षणिक चळवळ उभी करणारे पोलिस अधिकारी

शिवनंदन बाविस्कर
Thursday, 29 October 2020

तरुणांसाठी शैक्षणिक चळवळ उभी केली. त्याची सुरवात त्यांनी जन्मभूमीपासून म्हणजेच मांदुर्णेपासून केली. मग जवळच्या पिलखोड व सायगावात टेबल-खुर्ची फॅनसह सुसज्ज अभ्यासिका उभारल्या.

चाळीसगाव (जळगाव) : ''स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा निर्णय २००५- ०६ मध्ये घेतला. पण ते कसं करायचा हा समोर प्रश्‍न. कारण तेव्हा मार्गदर्शन करणारं कोणीच नव्हतं. हा अभ्यास करायचा म्हणजे जळगाव किंवा नाशिक हाच पर्याय. तेथे जाण्यासाठी तेव्हा पुरेसे पैसे नसल्याने एक वर्षांनंतर नाशिकला जावे लागले. तेव्हापासून मनाला एक खंत लागून राहिली. आपल्या भागात एकही लायब्ररी नाही किंवा मार्गदर्शन करणारा व्यक्ती नाही. तेव्हाच मनात निश्‍चय केला होता, माझ्या शिक्षणासाठी वर्ष वाया गेले, तशी वेळ कोणावर यायला नको. अन्‌ यशस्वी झाल्यापासून आतापर्यंत गावातल्या मुलांसाठी स्पर्धा परीक्षेच्या ज्ञानार्जनासाठी पूरक सुविधा देतो आहे," असं मांदुर्णेचे (ता. चाळीसगाव) सुपुत्र सहायक पोलिस निरीक्षक दीपक पाटील सांगत होते. 

पाटील यांची २०१२ मध्ये पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली. २०१३ मध्ये पहिली नियुक्ती मुंबईतील जुहू पोलिस ठाण्यात झाली. २०१६ ते २०१९ दरम्यान ते बांद्रा शीघ्र कृती दलात होते. त्यानंतर २०२० मध्ये त्यांना सहायक निरीक्षकपदी बढती मिळून भंडारा जिल्ह्यात बदली झाली. एप्रिल २०२० मध्ये त्यांनी पालांदूर (ता. लाखणी, जि. भंडारा) पोलिस ठाण्याचे प्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारला. 

उभी केली अभ्‍यासिका
तरुणांसाठी शैक्षणिक चळवळ उभी केली. त्याची सुरवात त्यांनी जन्मभूमीपासून म्हणजेच मांदुर्णेपासून केली. मग जवळच्या पिलखोड व सायगावात टेबल-खुर्ची फॅनसह सुसज्ज अभ्यासिका उभारल्या. ते एवढ्यावरच थांबले नाहीत. सध्या ते ज्या भागात कार्यरत आहेत. त्या कर्मभूमीतील बऱ्याच गावांमधील तरुणांसाठी त्यांनी पुस्तके, सरावासाठी मैदाने तयार करून दिली. गोळाफेकसाठी गोळाही दिला. त्यामुळे तरुणही आपल्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे पाटील यांच्याकडे लागणाऱ्या गोष्टींची थेट मागणी करतात. या कार्याबद्दल गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही पाटील यांचं ट्‌विटरवर कौतुक केलं. 

परीक्षांचा सराव... 
पालांदूर पोलिस ठाण्याच्या मैदानावर ते दर बुधवारी आणि शनिवारी सुमारे १५० ते २०० विद्यार्थ्यांचा परीक्षेचा सराव घेतात. उत्तीर्ण झालेल्या पहिल्या तीन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून चषक देतात. याशिवाय आठवड्यातून दोन ते तीन वेळा तरुणांना मार्गदर्शनही करतात. 

...अशी करताहेत तरुणांना मदत 

  • जळगाव जिल्ह्यात... 

- मांदुर्णे येथे पुस्तक वाटप 
- पिलखोड येथे अभ्यासिका (खुर्ची, फॅन व पुस्तके) 
- सायगाव येथे अभ्यासिका (टेबल-खुर्ची, लाइट-फॅन, यासाठी ४० हजारांचा खर्च) 

  • भंडारा जिल्ह्यात... 

- पालांदूर गावकऱ्यांच्या मदतीने पोलिस भरती करणाऱ्या मुलांसाठी मैदान तयार करून दिले 
- तई बुद्रुक येथे अभ्यासिकेसाठी पुस्तके दिली 
- मुरमाडी येथे पोलिस भरतीसाठी मैदान निर्मिती, डबल बार व पूलअप्स बारची निर्मिती 
- मेंढा येथे डबल बार व पूलअप्स बारची निर्मिती 
- झरप येथे मुलांना गोळा भेट 
- पालांदूर येथील मैदानावर मुलांसाठी व मुलींसाठी गोळा भेट 
- कोलारी येथे मुलींसाठी गोळा भेट 
- मेंढा, कोलारी येथे गावकऱ्यांनी उपलब्ध करून दिलेल्या खोलीत अभ्यासिका निर्माण करण्याचा मानस 

परिसरात स्पर्धा परीक्षेचे वातावरण निर्माण करायचंय. ग्रामीण भागातील तरुण सरकारी सेवेत रुजू व्हावा, अशी इच्छा आहे. त्यामुळे गिरणा परिसरातील प्रत्येक गावात अभ्यासिका उभारण्याचे माझे स्वप्न आहे. याशिवाय प्रत्येक माणसाला स्पर्धा परीक्षा काय असते, ती कशी दिली जाते. यासाठी जनजागृती करणार आहे. पालक मेळावे घेणार आहे. 
- दीपक पाटील, सहायक पोलिस निरीक्षक 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news chalisgaon police officer create liberty village student study