esakal | कुटूंब अजूनही निशब्‍द..मित्रांच्‍या डोळ्यातील पाणी आटेना
sakal

बोलून बातमी शोधा

shaheed yash deshmukh

यश हुतात्मा झाल्याचा फोन आल्यापासून त्याचे कुटुंबीय निःशब्द झाले आहे. यशच्या अंत्यसंस्कारावेळी आई, वडील, लहान भाऊ, दोन्ही बहिणी व नातलगांचा आक्रोश मन हेलावणारा होता. आजही घरी कोणी सांत्वनासाठी आल्यानंतर त्यांच्या डोळ्यातील अश्रू थांबत नाही.

कुटूंब अजूनही निशब्‍द..मित्रांच्‍या डोळ्यातील पाणी आटेना

sakal_logo
By
आनन शिंपी

चाळीसगाव (जळगाव) : खानदेशचा सुपुत्र यश देशमुख देशासाठी हुतात्मा झाला. घटनेला तीन दिवस झाले; मात्र, नि:शब्द पिंपळगावचा हुंकार आजही कायम आहे. आठवणींनी कंठ दाटून येतो... डोळे पाणावतात... मायभूमीसाठी रक्त सांडणाऱ्या आपल्या मित्राचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, आम्हीही सैन्यात भरती होऊन पाकला निधड्या छातीने धडा शिकवू, अशी भावना व्यक्त करत यश देशमुख यांच्या मित्रांनी आता सैन्यात जाण्याचा निश्‍चय केला आहे. 
तुम्ही सैन्यात भरती होण्यासाठीचा सराव सातत्यानं सुरू ठेवा, रोज कबड्डी खेळा, मी पुन्हा सुटीत आलो, की आपण सर्व बसून चर्चा करू व गावासाठी काही तरी वेगळे निश्‍चितपणे करू, जेणेकरून त्याचा गावाला लाभ होईल...’, हे हुतात्मा यशचे बोलणे त्याच्या मित्रांना आठवल्यानंतर त्यांचे डोळे पाणावतात. यश आपल्याला सोडून गेला, यावर अजूनही कोणाचा विश्‍वास बसत नाही. यशचे कुटुंबीयच नव्हे, तर संपूर्ण पिंपळगाव त्याच्या जाण्याने हळहळले आहे. 

दुःखाचे सावट अजूनही
राजदेहरे या ऐतिहासिक किल्ल्याच्या सान्निध्यात व श्रीक्षेत्र गंगाआश्रम या देवभूमीच्या जवळ असलेले अवघ्या दोन हजार लोकवस्तीचे पिंपळगाव. चाळीसगाव- नांदगाव रस्त्यावरील रोहिणी गावातील फाट्यावरून दोन किलोमीटर गेल्यानंतर पिंपळगाव लागते. ग्रामस्थांचा मुख्य व्यवसाय शेती असून, कपाशी आणि कांद्याचे सर्वाधिक उत्पन्न ग्रामस्थ घेतात. यश देशमुख यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्यापासून गावावरील दुःखाचे सावट अजूनही कमी झालेले नसल्याचे दिसून आले. एरवी विशेषतः सायंकाळी गावात दिसणारे तरुणांचे घोळकेही आता नि:शब्द झालेले दिसून आले. 
 
असे होते बालपण... 
हुतात्मा यश देशमुख यांचा जिवलग मित्र प्रशांत काकडे याने त्याच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. यशचे आठवीपर्यंतचे शिक्षण मामाच्या गावी निंभोरा (ता. रावेर) येथे झाले. पुढे बारावीपर्यंत तो चाळीसगावला राष्ट्रीय विद्यालयात शिकला. त्यानंतर एक वर्ष पुणे येथील खासगी ॲकॅडमीत सैन्य भरतीचे प्रशिक्षण घेतले. पुण्यात झालेल्या सैन्यभरतीत त्याची निवड झाली. या भरतीत यशचे काही मित्रही त्याच्यासोबत होते. मात्र, त्यांचे प्रयत्न कमी पडले. सैन्यात भरती होण्याचे यशचे स्वप्न पूर्ण झाले होते. २०१९ ला सैन्य दलातील प्रशिक्षणासाठी यश घरून निघाला. १७ मे २०२० मध्ये त्याची परेड झाली आणि सैनिकी कारकीर्दीला खऱ्या अर्थाने सुरवात झाली. आपण नाही पण, आपला मित्र सैन्यात भरती झाला, याचा अभिमान त्याच्या मित्रांना होता. 
 
...ती भेट शेवटचीच! 
अत्यंत मनमिळावू असलेल्या यशने गावात प्रचंड लौकिक मिळवला होता. कोणाच्याही मदतीला तो धावून जायचा. त्याची आठवण सांगताना प्रशांतचे डोळे भरून आले. तो म्हणाला, की १० सप्टेंबरला यश घरी आल्यानंतर रोजच्या गप्पांमध्ये आपल्याला गावासाठी काही तरी करायचे आहे, असे नेहमी सांगायचा. ३ ऑक्टोबरला तो जम्मू-काश्मीरमध्ये जाण्यासाठी निघाला. जाण्यापूर्वी तो गावातील प्रत्येकाला आवर्जून भेटला. लॉकडाउनमुळे रेल्वेसेवा बंद होती. त्यामुळे पिंपळगावहून बसने तो औरंगाबादला आला. त्याला सोडण्यासाठी गावातील पाच-सहा मित्र औरंगाबादपर्यंत गेले होते. ही त्या मित्रांची आणि त्याची शेवटची भेट ठरली. जम्मू-काश्मीरला पोचल्यानंतर यश आपल्या मित्रांशी रोज दुपारी संपर्क साधायचा. आता यशचा कधीच फोन येणार नाही, हे सांगतानाही मित्रांचे डोळे पाणावले होते. आपल्या गावासाठी काही तरी करण्याची त्यांची खूप इच्छा होती, ही इच्छा आता आम्ही सर्व मिळून पूर्ण करू, असा निर्धार त्याच्या मित्रांनी बोलताना व्यक्त केला. 
 
कबड्डीची आवड 
यशला लहानपणापासून कबड्डी खेळण्याची प्रचंड आवड होती. तो रोज कबड्डीचा सराव करायचा. पुण्यात असताना बऱ्याच सामन्यांमध्ये त्याने यश मिळवले होते. यश सोबत कबड्डी खेळलेल्या अनेक मित्रांनी त्याच्या खेळातील आठवणींना उजाळा दिला. 
 
पिंपळगावचे नाव केले उज्ज्वल 
यश देशमुख या शूरवीराच्या बलिदानाने पिंपळगावची ऐतिहासिक हानी झाली आहे, अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त करताना सरपंच संतोष देशमुख म्हणाले, की अवघ्या २१ व्या वर्षी यशचे आम्हा सर्वांना सोडून जाणे, यावर विश्‍वासच बसत नाही. संपूर्ण गावाचा यश चाहता होता. दशक्रिया विधीपर्यंत गावातील सर्वांनी आपापले नियोजित कार्यक्रम रद्द केले आहेत. यशने भारतमातेसाठी दिलेले बलिदान आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही. आमच्या गावातील तरुणांनी सैन्यदलात भरती होऊन पाकिस्तानातील दहशतवाद ठेचून काढू, असा निर्धार केला असल्याचे त्यांनी सांगितले. 
 
कुटुंबीय निःशब्द 
यश हुतात्मा झाल्याचा फोन आल्यापासून त्याचे कुटुंबीय निःशब्द झाले आहे. यशच्या अंत्यसंस्कारावेळी आई, वडील, लहान भाऊ, दोन्ही बहिणी व नातलगांचा आक्रोश मन हेलावणारा होता. आजही घरी कोणी सांत्वनासाठी आल्यानंतर त्यांच्या डोळ्यातील अश्रू थांबत नाही. यशचा चुलतभाऊ प्रशांत निकमही सैन्यात आहे. त्याच्यापासूनच यशने सैन्यदलात भरती होऊन देशसेवा करण्याची प्रेरणा घेतल्याचे त्याच्या नातलगांनी सांगितले. 
 
रनिंग ट्रॅक उभारणार 
यशच्या बलिदानानंतर गावातील तरुणांनी सैन्यात दाखल होण्याचा जणू निर्धारच केला आहे. गावापासून जवळच असलेल्या ज्या जागेवर हुतात्मा यशवर अंत्यसंस्कार करण्यात आले, त्या जागेवर सैन्य भरतीसाठी तयारी करता यावी, यासाठी लोकसहभागातून रनिंग ट्रॅक उभारू, असे गावातील तरुणांनी सांगितले. यासोबतच यशच्या बलिदानाची प्रेरणा सदैव मिळावी म्हणून गावातील शिवाजी चौकात त्याचे स्मारक देखील बांधण्याचे नियोजन असल्याचे या तरुणांनी सांगितले. 
 
हुतात्मा यश देशमुख यांच्या बलिदानाने चाळीसगाव तालुक्याच्या अजून एका सुपुत्राचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरले गेले आहे. सर्वांच्या सहकार्याने हुतात्मा यश यांचे यथोचित स्मारक निर्माण करून त्यांच्या बलिदानाची आठवण व प्रेरणा पुढील पिढ्यानपिढ्या ठेवण्याचा संकल्प यानिमित्ताने करतो. 
- मंगेश चव्हाण, आमदार, चाळीसगाव 

संपादन ः राजेश सोनवणे