आधीच नुकसान; आता परतीच्या पावसाचे संकट

दीपक कच्छवा
Friday, 16 October 2020

चाळीसगाव तालुक्यात सलग दुसऱ्या वर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. त्यामुळे उडीद, मूग या कडधान्यांना जबर फटका बसला. त्यानंतरही पाऊस सुरुच राहिल्याने कापसालाही तडाखा बसून कापूस पिवळा पडू लागला.

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) : महाराष्ट्रात परतीचा पाऊस अक्षरशा धुवून काढत असला तरी चाळीसगाव तालुक्‍यात मात्र किरकोळ प्रमाण असल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळत असला तरी गेल्या काही दिवसापासून ढगाळ वातावरण राहत असल्याने शेतकऱ्यांच्या पोटात भितीचा गोळ उठला आहे. पाऊस आला तर होत्याचे नव्हते होईल; अशी भिती शेतकऱ्यांना आहे. आधीच सततच्या आणि अति पावासामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असतांनाच आता पुन्हा परतीच्या पावसाचे संकट बळीरावर कोसळले आहे.

चाळीसगाव तालुक्यात सलग दुसऱ्या वर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. त्यामुळे उडीद, मूग या कडधान्यांना जबर फटका बसला. त्यानंतरही पाऊस सुरुच राहिल्याने कापसालाही तडाखा बसून कापूस पिवळा पडू लागला. त्यामुळे कापसाच्या उत्पादनात सरासरी २५ ते ३० टक्के घट झाली आहे. या स्थितीत आहे तो कापूस वेचण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु आहे. मात्र कापूस मोजणीस मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना स्वत:च्या कुटुंबासह भल्या पहाटेच शेत गाठावे लागत आहे. पावसाच्या भितीने दिवसभरात जेवढा कापूस वेचला जाईल तेवढा वेचण्यासाठी कसरत करावी लागत आहे. त्यातच पावसाने विश्रांती दिल्याने शेतकऱ्यांचा जीवात जीव आला होता. 

पावसाळी वातावरण
गेल्या तीन चार दिवसापासून पुन्हा तालुक्‍यात पावसाचे वातावरण निर्माण झाल्याने शेतकरी घामेघुम झाला आहे. पावसाच्या अधून मधुर सरी कोसळत असल्याने कापूस वेचणीस अडथळे येत आहे. राज्यात बऱ्याच भागात परतीच्या पावसाने अक्षरशा कहर केला आहे. चाळीसगाव तालुक्यात परतीच्या पावसाने रंग दाखवायला सुरवात केल्याने पांढरे सोने पुन्हा काळवंडण्याच्या भितीने शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. आज गुरुवारी तालुक्यात अनेक भागात पाऊस झाल्याने वेचणीला आलेल्या कापसाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातच गेल्या तीन दिवसभर ढगाळ वातावरण व अधून मधून कोसळणाऱ्या सरी यामुळे चिंता कायम आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news chalisgaon taluka rain again and farmer loss