
लॉकडाउनच्या काळात शहरी भागातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे. मात्र ग्रामीण भागातील सर्वच विद्यार्थ्यांना असे शिक्षण दिले जातेच असे नाही. ही बाब लक्षात घेऊन ओमप्रकाश थेटे यांनी ही अभिनव शिक्षण देण्याची संकल्पना स्वतः साकारली आहे.
चाळीसगाव (जळगाव) : कोरोना लॉकडाउनमुळे शाळा बंद आहेत. असे असले तरी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी पिंपळगाव प्र.दे. (ता. चाळीसगाव) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील उपक्रमशील शिक्षक ओमप्रकाश थेटे यांनी 'शाळा बंद, पण शिक्षण चालू' या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांचा 'व्हाट्सअप ग्रुप' तयार करून स्वनिर्मित व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवणे सुरू ठेवले आहे. विशेष म्हणजे, ज्या विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन नाही, अशांच्या घरी जावुन ते प्रत्यक्ष अध्यापन करीत आहेत.
लॉकडाउनच्या काळात शहरी भागातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे. मात्र ग्रामीण भागातील सर्वच विद्यार्थ्यांना असे शिक्षण दिले जातेच असे नाही. ही बाब लक्षात घेऊन ओमप्रकाश थेटे यांनी ही अभिनव शिक्षण देण्याची संकल्पना स्वतः साकारली आहे. स्वनिर्मित शैक्षणिक व्हिडिओ अभ्यासासाठी दिले जात आहे. आपल्या शिक्षकांचा आवाज व प्रत्यक्ष सर बघून विद्यार्थी आवडीने व्हिडिओ बघतात. त्यांनी यु- ट्यूबवर विद्यार्थ्यांसाठी अनेक शैक्षणिक व्हिडीओ अपलोड केले आहेत.
शिक्षक देतात होमवर्क अन् विद्यार्थी करतात पुर्ण
त्याच पद्धतीने त्यांना दररोज ग्रुपवर अभ्यास दिला जातो. विद्यार्थी अभ्यास पूर्ण करून तपासण्यासाठी ग्रुपवर टाकतात. ज्यांचा अभ्यास ग्रुप वर आला नाही. त्या विद्यार्थ्यांच्या पालकांना फोन करून अभ्यासाबाबत त्यांची अडचण सोडविली जात आहे. श्री. थेटे हे अध्यापन झालेल्या घटकांवर विद्यार्थ्यांसाठी स्वतः ऑनलाइन टेस्ट तयार करून सोडून घेत आहे. त्यांनी डाएट जळगाव यांना देखील विविध विषयांच्या ऑनलाइन टेस्ट तयार करून दिल्या आहेत. नुकतेच वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून शाळेला 25 पुस्तके त्यांनी भेट दिली आहेत. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. शाळा जरी बंद असल्या तरी विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात असल्याने पालक वर्गात समाधान व्यक्त होत आहे. त्यांना या कामी शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक वृंद यांचे सहकार्य लाभत आहे.
थेटो सरांबद्दल काही
ओमप्रकाश थेटे हे बालभारती पुणे येथे भूगोल विषयाचे अभ्यास गट सदस्य आहेत. त्यांनी इयत्ता सहावी ते दहावी भूगोल विषयांचे पाठ्यपुस्तक लेखन केले आहे. तसेच शिष्यवृत्ती परीक्षा मंडळ, पुणे येथे पाचवी गणित विषयाच्या मार्गदर्शिकेचे लेखनात सहभाग घेतला आहे. त्यांचा समाज माध्यमांचा शिक्षणात वापर, समावेशक शिक्षण समाज सहभागाचे योगदान यावर आधारीत विश्लेषणात्मक शोध निबंध आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे. ओमप्रकाश थेटे सर प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमावर आधारीत पी.एच.डी.करत आहेत. विद्यार्थ्यांना त्याच्या ज्ञानाचा उपयोग होत आहे.
संपादन ः राजेश सोनवणे