esakal | बहिणीचे लग्न मोडले...मग काय भावाची सटकली..आणि अशी घडली भयानक घटना ! 
sakal

बोलून बातमी शोधा

बहिणीचे लग्न मोडले...मग काय भावाची सटकली..आणि अशी घडली भयानक घटना ! 

एका तरुणीशी काही दिवसांपासून प्रेमसंबंध होते आणि ते दोघेही लग्न करण्याच्या तयारीतही होते. मात्र दोघांच्या प्रेमाची कुणकुण तरुणीच्या कुटुंबाला लागली

बहिणीचे लग्न मोडले...मग काय भावाची सटकली..आणि अशी घडली भयानक घटना ! 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) :  बहिणीचे ठरलेले लग्न मोडल्याचा राग येऊन संतप्त झालेल्या भावाने आपल्या साथीदारांसह येथील चोवीसवर्षीय तरुणाचे अपहरण करून त्याच्या पोटात चॉपरसारख्या धारदार हत्याराने वार करून त्याचा खून केल्याची घटना मेहुणबारे (ता. चाळीसगाव) येथे काल (२३ जून) सायंकाळी घडली. याप्रकरणी भऊर (ता. चाळीसगाव) येथील चौघांच्या विरोधात मेहुणबारे पोलिसांत अपहरण करून खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी चौघा संशयितांना ताब्यात घेतले आहे.
 
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मेहुणबारे येथील हरिकेश सुभाष सोनवणे (महाजन, वय २४) हा गावातील भरत वाघ यांच्या ट्रॅक्टरवर चालक म्हणून कार्यरत आहे. त्याचे भऊर येथील एका तरुणीशी काही दिवसांपासून प्रेमसंबंध होते आणि ते दोघेही लग्न करण्याच्या तयारीतही होते. मात्र दोघांच्या प्रेमाची कुणकुण तरुणीच्या कुटुंबाला लागली. त्यामुळे या तरुणीचा विवाह चिंचगव्हाण (ता. मालेगाव) येथील तरुणाशी कुटुंबीयांनी ठरवला. हरिकेशने चिंचगव्हाणला जाऊन त्याच्या प्रेमसंबंधाची माहिती तरुणीच्या नियोजित पतीला दिली. त्यानंतर हरीकेशचा त्या तरुणीशी संपर्क तुटला. काही दिवसांनी हरीकेश हा भरत वाघ यांच्या शेतात काम करीत असताना त्या तरुणीचा भाऊ व त्याचे साथीदार शेतात आले आणि ‘तुला जिवंत सोडणार नाही’ अशी त्यांनी धमकी दिली. 

मित्र धावला वाचवण्यासाठी 
मेहुणबारे येथील स्वामी समर्थ केंद्रासमोरील पंक्चर दुकानासमोर काल (२३ जून) सायंकाळी सातच्या सुमारास हरीकेश सोनवणे हा भरत वाघ यांच्या ट्रॅक्टरचे पंक्चर काढण्यासाठी दुकानदाराची वाट पाहत होता. त्या ठिकाणी दोन मोटारसायकलवर प्रवीण राजपूत, मयूर ऊर्फ महेश राजपूत यांच्यासह शुभम व महेंद्र राजपूत आले. शुभम, महेंद्र व महेश यांनी हरीकेशला पकडून ठेवत प्रवीण राजपूतने ‘तुझ्यामुळे बहिणीचे लग्न मोडले, तुला जिवंत सोडत नाही’ असे सांगत हातातील चॉपरसारख्या चाकूने हरीकेशच्या पोटात दोन- तीन वार केले. जखमी अवस्थेत हरिकेशला या चौघांनी मोटारसायकलवरून साई संकेत लॉन्सच्या मार्गाने भऊरकडे नेऊन पळ काढला. यावेळी भरत वाघ यांनी मोटारसायकलवरून त्यांचा पाठलाग केला. साई संकेत लॉन्सपासून काही अंतरावर वाघ हे चौघांच्या मोटारसायकलीला आडवे झाले. त्यावेळी प्रवीणने मोटारसायकल थांबवून ‘तू आमच्यात आला तर तुलाही जिवंत सोडणार नाही’ अशी धमकी दिली. त्यावेळी महेंद्रच्या हातात फायटर होते. मात्र, वाघने जिवाची पर्वा न करता हातात दगड घेऊन आरडाओरड केली. त्यामुळे हे चौघे घाबरले व हरीकेशला जखमी अवस्थेत सोडून ते पळून गेले. वाघ यांनी आपल्या मित्रांच्या मदतीने हरीकेशला मेहुणबारे ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर प्राथमिक उपचार करून १०८ रुग्णवाहिकेने चाळीसगावला खासगी दवाखान्यात नेले. मात्र, त्याची प्रकृती गंभीर असल्याने लगेचच धुळे येथे नेण्यात आले. धुळे येथे खासगी रुग्णालयाच्या बाहेरच डॉक्टरांनी त्याला तपासले असता हरीकेशचा मृत्यू झाल्याचे सांगितले. त्यानंतर त्याचा मृतदेह पुन्हा चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात विच्छेदनासाठी आणण्यात आला. 

पोलिसांत गुन्हा दाखल 
या प्रकरणी भरत वाघ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित प्रवीण राजेंद्र राजपूत, महेंद्र राजपूत, मयूर ऊर्फ महेश राजपूत, शुभम राजपूत (पूर्ण नावाची नोंद नाही, सर्व रा. भऊर) यांच्याविरोधात मेहुणबारे पोलिस ठाण्यात अपहरण व खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक हेमंत शिंदे तपास करीत आहेत. 

मेहुणबाऱ्यात तणाव 
या घटनेची माहिती काल (२३ जून) रात्री गावात कळताच तणाव निर्माण झाला होता. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस लक्ष ठेवून होते. या घटनेची माहिती कळताच अप्पर पोलिस अधीक्षक सचिन गोरे, उपविभागीय अधिकारी कैलास गावडे, मेहुणबारेचे सहाय्यक निरीक्षक सचिन बेंद्रे यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती जाणून घेतली. आज सकाळी महिलांसह संतप्त जमावाने मृतदेहासह पोलिस ठाणे गाठून आरोपींच्या तत्काळ अटकेची मागणी केली. जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत पोलिस ठाण्यातून मृतदेह हलवणार नाहीत, असा पवित्रा घेत तेथेच ठिय्या दिला. यावेळी नागरिकांच्या पोलिसांबद्दल भावना तीव्र होत्या. हरीकेश याला मारहाण होत असताना काहींनी पोलिसांना कळवले होते. मात्र, ते वेळेवर पोहोचले नाहीत, असा आरोप करून आपला संताप व्यक्त केला. यावेळी पोलिसांच्या गाडीवर दगडफेक करून खिडकीच्या काचाही फुटण्याचा प्रकार घडला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मेहुणबाऱ्यात जळगाव येथून पोलिसांची जादा कुमक मागवण्यात आली आहे.