जागेच्या कमतेरतमुळे ‘सीसीआय’ने कापूस खरेदी थांबविली 

गणेश पाटील
Wednesday, 2 December 2020

चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या घरात जवळपास निम्मा कापूस अद्याप पडून असून, सीसीआय केंद्रावर जवळपास साडेपाच ते पावणेसहा हजार रुपये क्विंटल कापसाची खरेदी होत आहे.

 चाळीसगाव : तालुक्यात असलेल्या सीसीआय अर्थात भारतीय कपास निगम लिमिटेडतर्फे खरेदी करण्यात येत असलेल्या केंद्रावर जागेअभावी कापसाची खरेदी थांबविण्यात आली आहे. तूर्तास खरेदी बंद केली असून, शेतकऱ्यांना तसे आवाहन केंद्राने बाजार समितीमार्फत पत्राद्वारे केले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे तारणहार असलेल्या सीसीआय केंद्राने काही दिवसांसाठी कापूस खरेदी थांबल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. 

आवश्य वाचा- भाजपला त्यांचे आमदार सांभाळण्यासाठी ‘सरकार पडणार’ असे म्हणावे लागतेय- एकनाथ खडसे 

चाळीसगाव तालुक्यात जवळपास ९० ते ९२ हजार एकर पेरणीयोग्य क्षेत्र आहे. एकूण क्षेत्रापैकी जवळपास ५८ ते ६० हजार हेक्टरवर कपाशीची यंदा खरिपाची लागवड करण्यात आली. यात २६ हजार ५८६ बागायत, तर ३४ हजार ४५२ अशा एकूण ६१ हजार ३८ हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड करण्यात आली. यातून जवळपास साडेचार ते पाच लाख क्विंटल कापसाचे उत्पादन शेतकऱ्यांना यंदा अपेक्षित आहे.

यंदा राज्यासह चाळीसगाव तालुक्यातील पावसाने चांगली हजेरी लावल्याने तेवढे उत्पन्नही शेतकऱ्यांना झाले आहे. त्यांपैकी काही शेतकऱ्यांनी खासगी व्यापाऱ्यांना आपल्याकडील कापूस घेतला तर भारतीय कपास निगम लिमिटेड अर्थात सीसीआयने जवळपास २५ ते २६ हजार क्विंटल कापसाची खरेदी १५ दिवसांत केली आहे. चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या घरात जवळपास निम्मा कापूस अद्याप पडून असून, सीसीआय केंद्रावर जवळपास साडेपाच ते पावणेसहा हजार रुपये क्विंटल कापसाची खरेदी होत आहे.

खासगी व्यापारी मात्र हा माल पाच हजार ते पाच हजार १०० रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे घेत असून, शेतकऱ्यांना सीसीआय केंद्रावर चांगला भाव मिळत असल्याने सीसीआय केंद्रावर कापूस विक्रीसाठी शेतकरी गर्दी करत आहेत. चाळीसगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड असताना विक्रीसाठी केवळ दोनच केंद्रे असल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांची मोठी परवड होत आहे. यामुळे कापूस खरेदी केंद्रे शासनाकडून वाढविण्यात यावीत, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. 

वाचा- सोमवारपासून शाळांची घंटा वाजणार ; ९ ते १२ वीचे वर्ग सुरू करणार -
जागा नसल्याने नामुष्की 
चाळीसगाव तालुक्यात दोन सीसीआय केंद्रे आहेत. या ठिकाणी विक्रीसाठी जवळपास दोनशे वाहने उभी आहेत. त्यांनी विक्रीसाठी आणलेला कापूस ठेवण्यासाठी या ठिकाणी जागा नसल्याने तूर्तास खरेदी थांबवावी, असे पत्र सीसीआय केंद्रातर्फे चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीला प्राप्त झाले आहे. त्यानुसार मंगळवारपासून या ठिकाणी वाहन नोंदणी बंद करण्यात आली आहे. 

 

चाळीसगाव तालुक्यात असलेल्या सर्व शेतकऱ्यांचा कापसाचा हा माल मोजला जाणार आहे. सीसीआय केंद्रात खरेदी सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांना तत्काळ या प्रकारच्या सूचना देण्यात येणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी गर्दी करू नये. 
-सतीश पाटील, प्रभारी सचिव, चाळीसगाव बाजार समिती

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news chalisgoan lack of space CCI stops buying cotton