esakal | सासऱ्याच्या मृत्यूनंतर जावयाचाही हृदयविकाराने मृत्यू

बोलून बातमी शोधा

सासऱ्याच्या मृत्यूनंतर जावयाचाही हृदयविकाराने मृत्यू
सासऱ्याच्या मृत्यूनंतर जावयाचाही हृदयविकाराने मृत्यू
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चाळीसगाव ः येथील स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या चाळीसगाव शाखेचे कार्याध्यक्ष विजय पाटील यांचे शुक्रवारी (ता. २३) पहाटे उपचारादरम्यान निधन झाले. दोन आठवड्यांपूर्वी पाचोरा येथे त्यांच्या सासऱ्यांचे निधन झाले होते. त्यानंतर जावयाचाही हृदयविकाराने मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचा: केळी नुकसानबाबत विमा कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची चाचपणी !

मुख्याध्यापक विजय पाटील (वय ५४) यांचे सासरे निवृत्त शिक्षक भीमराव पाटील यांचे दोन आठवड्यांपूर्वी पाचोरा येथे निधन झाले होते. त्यांच्या अंत्यविधीसाठी विजय पाटील गेले असता, तेथेच त्यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे तेथेच त्यांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले. त्यानंतर चाळीसगावला डॉ. मंगेश वाडेकर यांच्या रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. विजय पाटील यांच्यावर उपचार सुरू झाल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत बऱ्यापैकी सुधारणा झाली होती. त्यांची ऑक्सिजन लेव्हल वाढल्यामुळे त्यांना बरे वाटू लागले होते. मात्र, शुक्रवारी सकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले.

हाडाचा शिक्षक, कुशल संघटक, दिलदार मित्र, आदर्श व्यक्तिमत्त्वाचे धनी अशा अनेक उपाधी लाभलेल्या मुख्याध्यापक विजय पाटील यांच्या मृत्यूमुळे समाजात हळहळ व्यक्त होत आहे. शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात त्यांचे कार्य उल्लेखनीय होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माध्यमातून त्यांनी विविध उपक्रम राबवून आपल्या कार्याचा आगळावेगळा ठसा उमटविला होता. त्यांच्या मागे आई, पत्नी, मुलगा, दोन भाऊ असा परिवार आहे. मंदाणे (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील जिल्हा परिषदेच्या सदस्या पूनम पाटील यांचे ते जेठ, तर अनिलभय्या पाटील यांचे मोठे बंधू होत.

संपादन- भूषण श्रीखंडे