सातपुडातील आदिवासी पाड्यांवरील शेकडो बालके पोषण आहारापासून वंचित 

सातपुडातील आदिवासी पाड्यांवरील शेकडो बालके पोषण आहारापासून वंचित 

चोपडा : सातपुडा पर्वतरांगांमध्ये कुपोषणाची समस्या दिवसेंदिवस वाढत असताना त्याकडे प्रशासनाकडून सोयीस्कर दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. शासनाचा लाखो रुपयांचा निधी कुपोषणावर खर्च होतो; परंतु परिस्थितीत काही बदल होत नाही. यात धक्कादायक बाब म्हणजे गेल्या महिन्यात झालेल्या ‘नवसंजीवनी’च्या बैठकीत चर्चा होऊनही आदिवासी पाड्यांवरील शेकडो बालके अद्यापही पूरक पोषण आहारापासून वंचित असल्याचे वास्तव आहे. 

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली २५ ऑगस्टला ‘नवसंजीवनी’ची बैठक झाली. बैठकीनंतर बोलताना लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रणेत्या प्रतिभा शिंदे यांनी सांगितले होते, की बहुतेक आदिवासी पाड्यांमध्ये अंगणवाड्या नसून तेथील आदिवासी बालकांना पूरक पोषण आहार मिळत नसल्याची माहिती देऊनही तब्बल सव्वा महिना उलटूनही कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने प्रशासनच याकडे डोळेझाक करीत असल्याचे दिसून येत असून, नवसंजीवनीची बैठक नावालाच सोपस्कार पूर्ण करीत आहे. 


चोपडा तालुक्यातील कुंड्यापाणी व निमड्या येथील गावांमधील पाड्यांवर अंगणवाडी नसल्याने गावातील शून्य ते सहा वर्षे वयाच्या आतील मुलांचे पूरक पोषक आहार व शिक्षणापासून ते वंचित राहत असल्याची समस्या ‘नवसंजीवनी’च्या बैठकीत मांडण्यात आली होती. कुंड्यापाणी व ग्रामपंचायत निमड्यांतर्गत फिरंगीपाडा व हरसिंगपाडा हे दोन पाडे येतात. यात निमड्या गावापासून फिरंगीपाडा हे दोन किलोमीटर, तर हरसिंगपाडा हे दीड किलोमीटर अंतरावर येते. या पाड्यांवर अंगणवाडी नसल्याने घरोघरी जाऊन सेविका, मदतनीस पोषण आहार देतात. सद्य:स्थितीत शून्य ते सहा वयोगटातील बालकांना पूरक पोषण आहार मिळत नसल्याची माहिती खुद्द सरपंच इरफान तडवी यांनी दिली. फिरंगीपाडा पाड्यावर ४२, तर हरसिंगपाड्यावर ३८ बालके अशी एकूण ८० आदिवासी बालके काही महिन्यांपासून पूरक पोषण आहारापासून वंचित आहेत. कुपोषण कमी होईल की जास्त, याबाबत प्रशासनाने दखल घेण्याची गरज आहे. 

प्रस्ताव देऊनही बेदखल 
चोपडा पंचायत समितीकडे अंगणवाडीबाबत प्रस्ताव दिलेला आहे. मात्र, प्रस्ताव देऊनही दखल नाही. यामुळे या बालकांना पोषण आहार तर नाहीच पण शिक्षणही नाही. 

लाखोंचा निधी जातो कुठे? 
आदिवासींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व कुपोषण समस्या दूर करण्यासाठी शासनाचा लाखो रुपयांचा निधी दर वर्षी खर्ची पडतो; परंतु हे सगळे कागदावर आलबेल आहे. अजूनही विकासाचे प्रकाशकिरण आदिवासींच्या उंबरठ्यापर्यंत पोचले नाहीत. एवढा निधी कुणाच्या घशात जातो, हे पाहणे गरजेचे आहे. 


निमड्या ग्रामपंचायतीमध्ये फिरंगीपाडा व हरसिंगपाडा हे दोन्ही पाडे येतात. या ठिकाणी शून्य ते सहा वयोगटातील जवळपास ८० ते ९० बालके असून, ती काही महिन्यांपासून पूरक पोषण आहारापासून वंचित आहेत. या बालकांना शिक्षणासाठी बसायला जागाही नाही. पंचायत समितीकडे प्रस्ताव देऊनही काहीएक कार्यवाही नाही. 
-इरफान तडवी, सरपंच, ग्रामपंचायत, निमड्या 

जळगाव
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com