esakal | एक लिटर दुधाचा भाव..दोन पाण्याच्या बाटल्यांएवढा !

बोलून बातमी शोधा

milk, pani bottel
एक लिटर दुधाचा भाव..दोन पाण्याच्या बाटल्यांएवढा !
sakal_logo
By
सुनील पाटील

चोपडा : कोरोनाची दुसरी लाट, त्यामागून आलेली टाळेबंदी याचा फायदा उचलत बाजारात मागणी नसल्याचा कांगावा करत दुधाचे दर कमी केले जात आहेत. मात्र, प्रत्यक्षात दुधाला प्रतिलिटर उत्पादन खर्चाएवढादेखील दर सध्या मिळत नाही. दुधाचा लिटरमागे दहा रुपये दर वाढला असला तरी प्रतिलिटर उत्पादन खर्चाशी बरोबरी करत नसल्याचे वास्तव चित्र दिसून येत आहे. या काळात शेतकऱ्यांनी जगावे की मरावे, उत्पादन खर्च ५५ रुपये तर दुधाला मिळतात ३६ रुपये, दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुपटीने तोटा सहन करावा लागत असल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा: मृत्यूचे भय होते उशाशी..३५ दिवस कोरोनाशी झुंज

१९७३ मध्ये सरकारने दुधाचा उत्पादन खर्च काढण्यासाठी देवताळे समिती, तर १९८२ मध्ये निलंगेकर समिती नेमली होती. निलंगेकर समितीच्या निर्देशाप्रमाणे जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी कार्यालयातर्फे २०१८-१९ मध्ये दुधाचे उत्पादन खर्चाचे गणित मांडले गेले.

या अहवालानुसार गायीच्या प्रतिलिटर दुधाचा उत्पादन खर्च ४१ रुपये ७७ पैसे, तर म्हशीच्या प्रतिलिटर दुधाचा उत्पादन खर्च ७४ रुपये ५५ पैसे एवढा निर्देशित केला आहे. या अहवालामध्ये समाविष्ट केलेल्या निविष्ठांचे दर २०१८-१९ च्या तुलनेत दोन वर्षांत वाढले आहेत. त्यामुळे सध्याच्या दरानुसार दुधाच्या प्रतिलिटर उत्पादन खर्चात वाढ होणे अपेक्षित आहे. अहवालानुसार दुधाच्या उत्पादन खर्चाएवढादेखील सध्या दुधाला दर मिळत नसल्याचे वास्तव आहे.

हेही वाचा: तक्रार करण्याऐवजी आमदारांनी खांद्याला खांदा लाऊन काम करावे : शिरीष चौधरी

१५ एप्रिलपासून ३.५ फॅट व ८.५ एसएनएफ असणाऱ्या गायीच्या दुधाला २५ रुपये दर दिला जात आहे. यामध्ये काही दिवसांत दोन रुपयांची कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे काही दिवसांत हा दर २३ रुपयांवर येणार आहे.

...अन्यथा आंदोलन

प्रत्यक्षात राज्य सरकारने दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या निर्मिती व विक्रीवर कोणतेही निर्बंध लादले नाहीत. मात्र, प्राप्त परिस्थितीचा फायदा उचलत दूध संस्था दूध उत्पादकांची पिळवणूक करत आहेत. याचा फायदा सहकारी दूध संघाकडूनदेखील उचलला जात आहे. दूध उत्पादकांची पिळवणूक थांबवा, अन्यथा शेतकरी संघटना दूध उत्पादन उत्पादकांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारा शेतकरी संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, उपजिल्हाध्यक्ष किरण गुर्जर, जिल्हाध्यक्ष संजय महाजन आदींनी दिला आहे.

एक लिटर बिसलरीचे पाणी बनविण्यासाठी पॅकिंगसह तीन रुपये खर्च येतो. मात्र बाजारात बिसलरी २० रुपये लिटरने मिळते. एक लिटर दुधाला ३५ रुपये उत्पादन खर्च येतो. मात्र, त्याचा दर ४२ रुपये मिळतो. हे अन्यायकारकच आहे. सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्यावा.

-संदीप पाटील, माजी जिल्हाध्यक्ष, शेतकरी संघटना, जळगाव

शेतकऱ्यांना गायी-म्हशी पाळणे आता जिकिरीचे झाले आहे. कारण ढेपेचे दर गगनाला पोचले. चाऱ्याचे दर चार हजार रुपये शेकडा व असे जर सर्वच भाव वाढत गेले तर शेतकऱ्यांनी गायी-म्हशी पाळाव्यात की नाही? दुधाला तुम्ही ४० ते ५० रुपये लिटरने भाव देता, हे कितपत योग्य आहे.

-किरण गुर्जर, दूध उत्पादक शेतकरी

संपादन- भूषण श्रीखंडे