‘चोसाका’ भाडेतत्त्वासाठी हिरवा कंदील 

सुनील पाटील
Sunday, 1 November 2020

कारखान्यावर बुलढाणा अर्बन बँकेचे कर्ज असल्याने चोसाका भाडेतत्त्वावर देण्याबाबत चर्चा केली. या वेळी आजी-माजी अध्यक्षांसह संचालकही होते. भाडेतत्त्वावर देण्यासाठी बुलढाणा बँकेने सकारात्मकता दर्शविली आहे 
- अरुणभाई गुजराथी, माजी विधानसभा अध्यक्ष ​

चोपडा (जळगाव) : चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखाना हा सहयोगी किंवा भाडेतत्त्वावर देण्याबाबत बुलढाणा अर्बन बँकेकडून हिरवा कंदील मिळाला असून, बुलढाणा अर्बन बँकेचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांच्याशी सर्वपक्षीय नेत्यांनी तब्बल एक तास बैठकीत चर्चा केली. यावर श्री. चांडक यांनी सकारात्मकता दर्शवित ‘चोसाका’पुढे दोन प्रस्ताव ठेवले आहेत. यापैकी जो प्रस्ताव ऊस उत्पादक शेतकऱ्यांना व संचालक मंडळास मान्य असेल तो स्वीकार करून लवकरात लवकर मार्ग काढावा, असेही चर्चिले गेले. 
चोसाकावर ‘बुलढाणा अर्बन’चे ४० ते ४५ कोटी रुपयांचे कर्ज आहे. हे कर्ज कसे फेडायचे? यावर निर्णय काय? त्यासाठी माजी विधानसभाध्यक्ष अरुणभाई गुजराथी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पाटील, माजी आमदार कैलास पाटील, चोसाका अध्यक्ष अतुल ठाकरे, चोसाका माजी अध्यक्ष ॲड. घनश्याम पाटील, पीपल्स बँकेचे अध्यक्ष चंद्रहास गुजराथी, जिल्हा बँक संचालक डॉ. सुरेश पाटील, चोसाका संचालक प्रवीण गुजराथी, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संभाजी पाटील, काँग्रेसचे सरचिटणीस अजबराव पाटील यांनी श्री. चांडक यांची बुलढाणा येथे भेट घेत भाडेतत्त्वावर देण्याबाबत चर्चा केली. या वेळी बैठकीत राधेश्याम चांडक यांनी होकार दर्शवित दोन प्रस्ताव ठेवले आहेत. यात चोसाका भाडेतत्त्वावर देण्यासाठी प्रस्ताव पाठवून मंत्री समितीची परवानगी लवकर मिळवावी. परवानगी मिळाल्यानंतर कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यासाठी संयुक्तिक जाहिरात दिली जाईल. भाडेतत्त्वावर देण्याबाबत १७ ते १८ वर्षांचा करार करून कारखाना भाडेतत्त्वावर जी पार्टी घेईल त्यांच्याकडून अटी व शर्ती सोडविण्यात येतील. 

वन टाईम सेटलमेंट
‘बुलढाणा’चे चोसाकावर जे कर्ज आहे, त्याबाबत ‘वनटाइम सेटलमेंट’ करून या रकमेचे समान हप्ते करण्यात येतील. चोसाकाला व्याज देणे परवडणार नाही. हप्त्यात फेड होणाऱ्या रकमेवर व्याज आकारले जाणार नसल्याचीही माहिती मिळाली. तर दुसऱ्या प्रस्तावात चोसाका संचालक मंडळाने ठराव करून दिल्यास व बुलढाणा अर्बन बँकेस चोसाकाने न्यायालयामार्फत प्रतिज्ञापत्राद्वारे करार अटी, शर्ती करून दिल्या तर ‘बुलढाणा अर्बन’ स्वतः कारखाना चालविण्यासाठी विचार करेल. यावर निर्णय घ्यावा, मात्र शेतकऱ्यांची एफआरपीची थकीत रक्कम कमी केल्यास चोसाका पूर्ववत सुरू होईल. मागील देणी, शेतकऱ्यांचे पेमेंट, कामगारांचे वेतन याबाबतचा निर्णय नेत्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करून ते कसे फेड करायचे ते स्थानिक पातळीवर ठरवावे. 

सर्वपक्षीय नेत्यांची वज्रमूठ 
बैठकीत एक तास चर्चा झाली. यात शंकांचे निरसन करून सकारात्मक चर्चा झाली असून, २०२१ चा चोसाका गळीत हंगाम सुरू होण्याची शक्यता असून, याबाबत चोसाका अध्यक्ष अतुल ठाकरे यांनी यास दुजोरा दिला आहे. एकंदरीत सर्वपक्षीय नेत्यांनी चोसाकाबाबत वज्रमूठ बांधली असून, पुढील गाळप हे भाडेतत्त्वावर सुरू होण्याची चिन्हे दिसून येत आहेत. 
 

शासनाच्या ध्येयधोरणानुसार भाडेतत्त्वावर देण्याची परवानगी मिळाल्यानंतर संयुक्तिक जाहिरात दिली जाईल. शेतकरी, कामगार यांच्या हिताच्या दृष्टीने निर्णय घेऊन २०२१-२२ चे गाळप सुरू होईल. यासाठी शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त उतारा असलेल्या उसाची लागवड करावी. 
- अतुल ठाकरे, अध्यक्ष, चोसाका 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news chopda sugar factory tenancy in green signal