ऊसलागवडीशिवाय ‘चोसाका’ भाडेतत्त्वावर देणे अशक्य..!  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

chopda suger factory

बंद अवस्थेत असलेला चोसाका पुढील गळितात सुरू होण्याची चिन्हे दिसून येत असली, तरी यासाठी तालुक्यातील शेतकरी, कामगार, ऊसतोड मजूर यांना न्याय देऊन, त्यांचे सहकार्य असणे गरजेचे आहे.

ऊसलागवडीशिवाय ‘चोसाका’ भाडेतत्त्वावर देणे अशक्य..! 

चोपडा (जळगाव) : चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासाठी ऊसलागवडीची गरज आहे. कार्यक्षेत्रात ऊस असेल तर निश्चितच भाडेतत्त्वावर घेणारा सकारात्मक विचार करेल? जर परिसरात ऊसच नाही तर कारखाना कसा चालेल? यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी जास्त उतारा असलेला ऊसलागवड करणे गरजेचे आहे. ऊसलागवडीशिवाय चोसाका भाडेतत्त्वावर देणे अशक्य आहे. बंद अवस्थेत असलेला चोसाका पुढील गळितात सुरू होण्याची चिन्हे दिसून येत असली, तरी यासाठी तालुक्यातील शेतकरी, कामगार, ऊसतोड मजूर यांना न्याय देऊन, त्यांचे सहकार्य असणे गरजेचे आहे. नाहीतर बंद अवस्थेत असलेला चोसाका बंदच राहणार आहे. 
‘चोसाका’ला भाडेतत्त्वावर देण्याबाबत बुलडाणा बँकेकडून हिरवा कंदील मिळाला असून, याबाबत संचालक मंडळाचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु भाडेतत्त्वावर घेणारी पार्टी ही प्रथम परिसरात ऊसलागवड किती आहे? चोसाकावर कर्ज किती? कामगारांचे थकीत वेतन? शेतकऱ्यांचे पेमेंट यासह अन्य काही सर्व बाबींचा पडताळा करून मगच भाडेतत्त्वावर घेण्याचा विचार करणार आहे. यात सर्वांत महत्त्वाचा विषय म्हणजे ‘ऊसलागवड’ आहे. याकडे शेतकऱ्यांनी लक्ष घातल्यास चोसाका कार्यक्षेत्रात दमदार ऊसलागवड होऊ शकते. तालुक्याचा मानबिंदू असलेला चोसाका सुरू व्हावा, ही प्रत्येकाची इच्छा असली तरी कारखाना हितासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. सद्य:स्थितीत बंद असलेल्या कारखान्याची चाके सहकार्य केल्यास सुरू होतील. कारखाना हा शेतकऱ्यांचा आहे. शेतकरीच मालक आहेत. यामुळे शेतकऱ्यांनीच यावर विचारमंथन करून ऊसलागवड करून चोसाकाला वाचवावे. शेतकऱ्यांनी चोसाका २०२१-२२ या गळीत हंगामासाठी ऊसलागवड धोरण निश्चित करून कारखान्याच्या गाळप क्षमतेला अनुसरून उसाची लागवड मोठ्या प्रमाणात करावी, एकरी उसाच्या उत्पादनात व साखर उताऱ्यात वाढ व्हावी, यासाठी जास्त साखर उतारा देणाऱ्या ऊसलागवडीला प्राधान्य देणे गरजेचे आहे. यात को- ८६०३२, व्हीएसआय- ८००५ या जास्त साखर उतारा देणाऱ्या जातीच्या उसाची आडसाली, पूर्वहंगामी व सुरू हंगामी लागवड करणे गरजेचे आहे. 

पूर्वानुभव वाईट 
तालुक्यातील शेतकरी एकीकडे रक्ताचे पाणी करून उसाचे पीक घेत आहेत. आपल्या जीवनात उसाने गोडी आणावी, यासाठी ते झटत आहेत. परंतु यापूर्वीही शेतकऱ्यांनी चांगल्या प्रमाणात ऊसलागवड केली आहे. पण शेतकऱ्यांना याचे वाईट अनुभव आले आहेत. पुन्हा तसे होणार नाही, याकडे लक्ष देऊन कारखाना पूर्ण क्षमतेने कसा चालेल, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. 

अवकाळीने नुकसान 
या वर्षी केळी, पपई, कापूस, मूग, ज्वारी, मका, गहू यासह अन्य सर्व पिकांचे वादळी वारा व पाऊस यामुळे अतोनात नुकसान झाले आहे. यावर रोखीचे पीक म्हणून ऊसलागवड करणे योग्य ठरणार आहे. 


संपादन ः राजेश सोनवणे
 

loading image
go to top