
भावंडांना आईची आठवण कधीही येऊ दिले नाही. दीपालीला शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले आणि आज विज्ञान शाखेची पदवीधर बनविले.
धरणगाव : घरात अठराविश्व दारिद्र्य, वयाच्या दहाव्या वर्षी मातृछत्र हरपले, वडिलांनी दुर्लक्षित केले. मात्र जिद्द, मेहनत आणि मामाची साथ या बळावर दीपाली निकाळजे या मातंग समाजाच्या विद्यार्थिनीने तालुक्यात मातंग समाजात पहिली विज्ञान पदवीधर होण्याचा मान मिळविला. दीपालीला बी. एस्सी.मध्ये ७७.११ टक्के गुण मिळाले आहे. मातृछत्र हरपलेल्या दीपालीची उज्ज्वल भविष्याकडे प्रेरणादायी वाटचाल सुरू आहे.
आवश्य वाचा- पोलिस ठाण्याशेजारीच पूल पार्टीचा धिंगाणा
अमोना (जि. बुलडाणा) येथील दीपाली निकाळजे हिची घरची परिस्थित अत्यंत नाजूक, अशात वयाच्या दहाव्या वर्षी मातृछत्र हरपले. आई गेल्याने वडिलांनी पूर्णपणे दुर्लक्ष केले. अशा परिस्थितीत या चिमुकलीला डोळ्यांसमोर अंधार दिसत होता. मात्र दीपालीचे मामा संजय तोडे धरणगाव कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयाचे चतुर्थ श्रेणी कर्मचारी हे दीपालीच्या आईची भूमिका निभावत आहेत. बहिणीच्या मृत्यूनंतर दीपालीसह भावंडांची जबाबदारी संजय तोडे यांनी स्वीकारली आणि या भावंडांना आईची आठवण कधीही येऊ दिले नाही. दीपालीला शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले आणि आज विज्ञान शाखेची पदवीधर बनविले. एवढेच नव्हे, तर ही विद्यार्थिनी धरणगाव तालुक्यात मातंग समाजातील पहिली पदवीधर विद्यार्थिनी ठरली आहे. संपूर्ण तोडे परिवाराला दीपालीच्या यशाचा अभिमान आहे.
समाजातील मुलींसाठी कार्य करण्याचा मानस
भविष्यात पदव्युत्तर शिक्षण घेऊन समाजाची, राष्ट्राची सेवा करायची, तसेच ज्या समाजात आपण जन्माला आलो या समाजासाठी खास करून मातंग समाजातील मुलींसाठी कार्य करण्याचा दीपालीचा मानस आहे. तिच्या यशाचे श्रेय दीपाली आपले मामा संजय तोडे, मामी सुनीता तोडे, दीपालीचे आजोबा भीमराव तोडे, आजी यांना देते.
वाचा- शेंडीने दाखवला चोरट्यांचा पत्ता
दिपालीचा केला सत्कार
दिपालीच्या यशाबद्दल मातंग समाज आणि वाल्मीकी समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला. मातंग समाजाच्या वतीने प्रल्हाद जाधव, सुनील चित्ते, समाधान चित्ते, सतीश जाधव यांनी गौरव केला. वाल्मीकी समाजाच्या वतीने विनोद पचरवाल, पापा वाघरे, सूरज वाघरे, मनीष पचरवाल, भैला, मेघा पचरवाल यांनी गौरव केला. तर संस्थेच्या वतीने अध्यक्ष डॉ. अरुण कुलकर्णी, उपाध्यक्ष वसंतराव गाळापुरे, सचिव डॉ. मिलिंद डहाळे, संचालक अजय पागारिया, प्राचार्य डॉ. टी. एस. बिराजदार, उपप्राचार्य डॉ. किशोर पाटील, धरणगाव तालुका टीडीएफचे अध्यक्ष डी. एस. पाटील यांच्यासह प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी वर्गानी अभिनंदन केले.
संपादन- भूषण श्रीखंडे