शाळांमध्ये पुन्हा बुधवार पासून किलबिलाट 

अल्हाद जोशी
Monday, 25 January 2021

विद्यार्थ्याच्या तापमानाची तपासणी केल्यानंतर त्यास शाळेत ठराविक अंतरावर प्रवेश देण्यात येणार आहे. शिक्षकांनी स्वत:ची कोरोना तपासणी करून घेणे बंधनकारक आहे.

एरंडोल : कोरोनामुळे बंद असलेल्या शैक्षणिक संस्था शासनाच्या आदेशानुसार बुधवार पासून सुरू होणार आहेत. तालुक्यातील पाचवी ते आठवीचे वर्ग असलेल्या ९२ शाळांचा यात समावेश आहे, अशी माहिती गटशिक्षणाधिकारी विश्वास पाटील यांनी दिली. शाळा सुरू करण्यापूर्वी सर्व दक्षता घेण्याची सूचना त्यांनी मुख्याध्यापकांना दिली आहे. 

आवश्यक वाचा- एक असे रूग्‍णालय जेथे २१ वर्षानंतर प्रथमच झाले ‘सिझर’
 

राज्यात कोरोनामुळे सुमारे दहा महिन्यांपासून सर्व शाळा बंद होत्या. शासनाने बुधवारपासून पाचवी ते आठवीपर्यंत वर्ग सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार तालुक्यातील पाचवी ते आठवीपर्यंत वर्ग जिल्हा परिषदेच्या ४४, खासगी प्राथमिक ११, खासगी आश्रमशाळा दोन तसेच माध्यमिकच्या ३५ शाळा सुरू होणार आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळांत दोन हजार ९५६ विद्यार्थी असून, खासगी शाळांमध्ये आठ हजार २५३ विद्यार्थिसंख्या आहे. तालुक्यात जिल्हा परिषदेचे १३३ शिक्षक असून, माध्यमिक शिक्षकांची संख्या २७२ आहे.
 

आवर्जून वाचा- जळगाव जिल्ह्याला १९ हजार नवीन लसी उपलब्ध; आजपासून १३ केंद्रांवर लसीकरण
 

शाळेत विद्यार्थ्यांसाठी मुख्याध्यापक व पालकांचे संमतिपत्र आवश्यक आहे. शाळा खोल्या, स्वच्छतागृह व शाळेचा परिसर स्वच्छता, शाळांमध्ये सॅनिटायझर फवारणीचे आदेश दिले आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर मास्क आवश्यक असून, विद्यार्थ्यांनी पाण्याची बाटली सोबत आणण्याचे आवाहन केले आहे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या तापमानाची तपासणी केल्यानंतर त्यास शाळेत ठराविक अंतरावर प्रवेश देण्यात येणार आहे. शिक्षकांनी स्वत:ची कोरोना तपासणी करून घेणे बंधनकारक आहे. शिक्षक अथवा कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्यास त्यांना शाळेत बोलावू नये, असे आदेश दिले आहेत.

 
दरम्यान, पाचवी ते आठवीपर्यंत शाळा सुरू होत असल्याने शाळेचा परिसर पुन्हा गजबजणार आहे. यापूर्वी नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व शाळा, शिक्षक आणि पालकांनी योग्य ती दक्षता घ्यावी, असे आवाहन गटशिक्षणाधिकारी विश्वास पाटील यांनी केले आहे.  

 

संपादन- भूषण श्रीखंडे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news erando school starts from wednesday