शेतात रात्री कामासाठी तरुण निघाला आणि काळरुपी ट्रॅक्टर त्याच्या अंगावरून गेला  

अल्हाद जोशी
Thursday, 3 December 2020

ग्रामस्थांच्या मदतीने सचिन यास ट्रॅक्टरखालून काढून एरंडोल येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.

एरंडोल : रात्री शेतात कामासाठी जाणाऱ्या युवकास भरधाव ट्रॅक्टरने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. सचिन श्रीराम सुरसे (वय ३०, रा. रिंगणगाव) असे मृताचे नाव आहे. हा अपघात बुधवारी (ता. २) मध्यरात्री रिंगणगाव शिवारात झाला. 

वाचा- तलाठी आप्पाची रिेकॉर्डींग झाली व्हायरल; आणि त्‍यांची ततफफ.. 

सचिन सुरसे हा तरुण बुधवारी रात्री अशोक नामदेव मते यांच्या शेतात कामासाठी निघाला. सचिन सुरसे यांनी अशोक मते यांची शेती केली होती. रात्री रिंगणगाव विखरण रस्त्याने शेतात जात असताना सचिन यास ट्रॅक्टरने (एमएच १९, सीवाय १३०८) त्यास जोरदार धडक दिल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. रस्त्यावरून जाणाऱ्या सचिन रमेश जगताप यांनी सचिनचा भाऊ समाधान सुरसे यांना अपघाताची माहिती दिली.

धडक देवून ट्रॅक्टर खड्यात उलटले

सचिन यास ट्रॅक्टरने धडक देत ट्रॅक्टर पाटाजवळील खोल खड्ड्यात उलटले असून, सचिन ट्रॅक्टरखाली दाबला गेला होता. सचिनचा भाऊ समाधान व सचिन जगताप हे घटनास्थळी आले. ग्रामस्थांच्या मदतीने सचिन यास ट्रॅक्टरखालून काढून एरंडोल येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. याबाबत समाधान सुरसे यांनी दिलेल्या तक्रारीवरून ट्रॅक्टरचालक शरद आनंदा शिंदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस तपास करीत आहेत. 
 

जळगाव

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news erandol accidental death of a young man on his way to work in a field