त्‍या शिक्षकाच्या खुनाचे गूढ; मोबाईल, पाकिटातून उलगडणार

आल्‍हाद जोशी
Thursday, 10 December 2020

रात्री साडेदहाच्या सुमारास ते आदर्शनगरातील आपल्या क्षितीज या निवासस्थानी आले होते. त्यानंतर किशोर पाटील यांना पहाटे तीनला मोबाईलवर कॉल आल्यामुळे ते घरातून बाहेर पडल्याचे त्यांच्या पत्नीने सांगितले.

एरंडोल (जळगाव) : गालापूर (ता. एरंडोल) येथील अदिवासी वस्तीतील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक तथा आदर्श शिक्षक व राज्यातील विविध शिक्षक संघटनांच्या समन्वय समितीचे सचिव यासह विविध संघटनांवर कार्यरत असलेले किशोर पाटील (कुंझरकर) यांच्या मारेकऱ्यांना पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. दरम्यान, घटनास्थळावरून गायब असलेला त्यांचा मोबाईल व खिशातील पाकीट खुनाचे गूढ उकलण्यात महत्त्वाचा दुवा ठरू शकतो. त्यामुळे त्याचाही पोलिस कसून शोध घेत आहेत. 

किशोर पाटील यांच्या मारेकऱ्यांना लवकरच ताब्यात घेण्यात येईल, पोलिस सर्व बाजूंनी तपास करीत असल्याचे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांनी सांगितले. दरम्यान, बुधवारी (ता.९) रात्री किशोर पाटील यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी विविध शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच नातेवाईकांनी मारेकऱ्यांना त्वरित शोधून अटक करण्याची मागणी केली. चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी किशोर पाटील यांच्या परिवाराला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. तसेच पोलिस महानिरीक्षक, जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्यासह पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. गृहमंत्री अनिल देशमुख याची भेट घेणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. 

...अन् घात झाला 
शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी सतत प्रयत्नशील असलेले आदर्श शिक्षक किशोर पाटील कुंझरकर यांचा मृतदेह बुधवारी सकाळी पळासदड शिवारात संशयास्पद स्थितीत आढळून आल्यामुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. किशोर पाटील हे मंगळवारी (ता. ८) सकाळी संत जगनाडे महाराज यांच्या जयंती कार्यक्रमास उपस्थित होते. सायंकाळी ते भुसावळ येथे अनिल चौधरी यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमास उपस्थित होते. रात्री साडेदहाच्या सुमारास ते आदर्शनगरातील आपल्या क्षितीज या निवासस्थानी आले होते. त्यानंतर किशोर पाटील यांना पहाटे तीनला मोबाईलवर कॉल आल्यामुळे ते घरातून बाहेर पडल्याचे त्यांच्या पत्नीने सांगितले. त्यानंतर त्यांचा मृतदेहच आढळून आल्यामुळे त्यांचा घातपात झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. 

गूढ वाढले 
किशोर पाटील यांच्या शर्टाचे बटणे तुटून घटनास्थळी पडले होते. तसेच अंगातील स्वेटर घटनास्थळापासून काही अंतरावर पडले होते. पाटील यांच्या पायातील बूट, मोबाईल व खिशातील पाकीट देखील सापडलेले नाही. त्यामुळे खुनाचे गूढ वाढले आहे. घटनास्थळी गुटख्याची खाली पाकिटे पडली होती. 

मार लागल्यानेच मृत्यू : अहवाल 
दरम्यान, किशोर पाटील यांच्या अंगावर मारहाणीच्या खुणा आढळून आल्या आहेत. शर्ट व बनियन फाटलेले असल्यामुळे मारेकऱ्यांबरोबर त्यांची झटापट झालेली असण्याची शक्यता आहे. किशोर पाटील यांच्या डोक्याला मागील बाजूर जबर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात म्हटले आहे. 

आमदार चव्हाणांकडून सांत्वन 
अंत्यसंस्कारास उपस्थित असलेले चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांची नातेवाईक व शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली. आमदार मंगेश चव्हाण यांनी किशोर पाटील यांच्या परिवाराला न्याय मिळवून देईल, असे आश्वासन दिले. किशोर पाटील यांच्या मारेकऱ्यांना पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले असून, पोलिस सर्व बाजूंनी तपास करीत आहेत. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news erandol teacher kishor patil murder case