पावसापासून बचाव म्‍हणून झाडाखाली राहिले उभे; वीज कडाडली अन्‌

आल्‍हाद जोशी
Saturday, 17 October 2020

कापुस वेचणी झाल्यानंतर तिघेही युवक घरी जाण्याच्या तयारीत असतांना अचानक विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली पाउस सुरु असल्यामुळे तिघेही युवक पावसापासून बचाव करण्यासाठी झाडाच्या आडोशाला उभे राहिले.

आडगाव (जळगाव) : आडगाव (ता.एरंडोल) येथे सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास वीज कोसळुन दोन युवक ठार झाले. तर एक युवक जखमी झाल्याची घटना घडली. वीज कोसळुन दोन युवकांचा मृत्यू झाल्यामुळे गावावर शोककळा पसरली आहे.

आडगाव येथील उखर्डू पवार यांच्या ढोली शिवारातील शेतात त्यांची मुले महेंद्र उखर्डू पवार, जगदीश उखर्डू पवार आणि त्यांचा मित्र रवींद्र प्रभाकर महाजन हे कापुस वेचण्यासाठी गेले होते. तिघाही युवकांनी दिवसभर कापसाची वेचणी केली. सायंकाळी कापुस वेचणी झाल्यानंतर तिघेही युवक घरी जाण्याच्या तयारीत असतांना अचानक विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली पाउस सुरु असल्यामुळे तिघेही युवक पावसापासून बचाव करण्यासाठी झाडाच्या आडोशाला उभे राहिले. अचानक जोरदार आवाज होऊन तिघांच्या अंगावर वीज कोसळली. यात महेंद्र उखर्डू पवार (वय २३) व रवींद्र प्रभाकर महाजन (वय २२) हे दोन युवक जागीच ठार झाले. तर जगदीश पवार गंभीर जखमी झाले.

वीजेच्या आवाजाने शेतकऱ्यांची धाव
वीज कोसळल्याचा जोरदार आवाज झाल्यामुळे परिसरात शेतात काम करणारे शेतकरी व शेतमजुरांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. वीज कोसळुन दोन युवक ठार झाल्याची घटना ग्रामस्थांना समजताच नागरिकांनी शेताकडे धाव घेतली आणि जखमी झालेल्या जगदीश पवार यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले. 

वडीलांनी केला होता विरोध
वीज कोसळुन मयात झालेले दोन्ही युवक अविवाहित असून रवींद्र महाजन हा प्रभाकर महाजन यांचा एकुलता एक मुलगा होता. प्रभाकर महाजन यांनी मुलगा रवींद्र यास शेतात कापूस वेचणीसाठी जाण्यास विरोध केला होता. मात्र मित्राच्या शेतात मित्रांसोबत कापूस वेचण्यासाठी जात आहे; असा अट्टाहास त्याने केला आणि सायंकाळी आपला जीव गमावून बसला. दरम्यान गावातील दोन युवक ठार झाल्यामुळे गावावर शोककळा पसरली आहे. याबाबत कासोदा पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. आडगाव येथे वीज कोसळुन दोन युवक ठार झाल्यानंतर देखील रात्री साडेआठ वाजेपर्यंत शासकिय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिलेली नसल्यामुळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली.

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news erandol two youths killed in lightning strike