अल्‍पवयीन मुलाची हिंम्‍मत..फिल्पकार्ट पार्सलची बॅग लांबविली; दोघे अटकेत 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 31 October 2020

ऑनलाईन खरेदीवर उत्‍सव धमाका सुरू आहे. यामुळे बुकिंग केलेले पार्सल पोहचविण्याचे काम जोरात सुरू आहे.

जळगाव : फिल्पकार्टचे पार्सलची बॅग चोरट्यांनी लांबविल्याची घटना गुरूवारी दुपारी दृष्टी हॉस्पिटलसमोर घडली होती. या गुन्ह्यातील संशयित दोन आरोपींना अटक करण्यात आली असून एक अल्पवयीन आहे. दोघांविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

ऑनलाईन खरेदीवर उत्‍सव धमाका सुरू आहे. यामुळे बुकिंग केलेले पार्सल पोहचविण्याचे काम जोरात सुरू आहे. अशात संजय सोपान पाटील (वय-३०, रा. ओम शांतीनगर, पिंप्राळा जळगाव) हा तरूण गेल्या तीन ते चार वर्षांपासून फ्लिपकार्टचे पार्सल डिलेव्हरीचे काम करतो. काल २९ ऑक्टोबरला सकाळी दहा वाजता फिल्पकार्टचे पार्सल बॅगमध्ये वस्तू डिलेव्हरीसाठी बाहेर पडला. दुपारी दोनच्या सुमारास शहरातील रामा बिअर बार जवळील दृष्टी हॉस्पिटलमध्ये पार्सल देण्यासाठी आले. 

दोन मिनिटात बॅग गायब
पार्सलच्या बॅगमध्ये सामान जास्त असल्याने त्यांनी बॅग दुचाकीवर ठेवून पार्सल देण्यासाठी गेले. दोन मिनीटात पार्सल देवून खाली आले असता त्यांच्या दुचाकीवरून अज्ञात चोरट्यांनी पार्सलची बॅग लंपास केली. बॅगेत विविध पार्सलचे एकूण ४२ हजार २०३ रुपये किंमतीचे सामान होते. संजय पाटील यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

दोघेही ताब्‍यात
गुन्हा दाखल झाल्यानंतर जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथकातील सहाय्यक पोलिस निरीक्षक अशोक महाजन, संजय पवार, रमेश जाधव, हवालदार परेश महाजन, पंकज शिंदे हरीष परदेशी यांनी रिंगरोडवरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर संशयित आरोपी कुणाल शिवदास पाटील (वय-१९, रा. हरीविठ्ठलनगर) आणि १७ वर्षीय अल्पवयीन मुलाला अटक केली आहे. तर त्यांच्या ताब्यातील ऑनलाईन फ्लिपकार्ट कंपनीचा सामान, गुन्ह्यातील दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे. पुढील कारवाईसाठी दोघांना जिल्हा पेठ पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaoh flipcart bag robbery two boy arrested police