
१९ सप्टेंबर ते १२ ऑक्टोबर २०२० दरम्यान सायकलने २४ दिवसांत चार हजार किलोमीटर प्रवास केला.
जळगाव : महाराष्ट्रातील ३६ जिल्हाधिकारी कार्यालयांत जाऊन शहिदांना श्रद्धांजली व कोरोनायोद्धा डॉक्टर, नर्स यांच्याप्रति सद्भावना व्यक्त करण्यासाठी ३६ जिल्हे सायकलवर भ्रमंती पूर्ण केलेल्या अजित दळवी यांचा सत्कार जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते नुकताच झाला.
जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, जळगावातील सायकलप्रेमी मंडळींतर्फे श्री. दळणी यांच्या सन्मानार्थ पद्मालय सायकल राइडचे आयोजन करण्यात आले होते.
श्री. दळवी यांनी १९ सप्टेंबर ते १२ ऑक्टोबर २०२० दरम्यान सायकलने २४ दिवसांत चार हजार किलोमीटर प्रवास केला. जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील यांच्या आवाहनास प्रतिसाद देत श्री. दळवी यांच्यासोबत पहाटे पाचला जळगाव शहरातून ४० सायकलिस्ट, तसेच पहाटे साडेतीनला चाळीसगाव येथून टोनी पंजाबी, रवींद्र पाटील, सोपान चौधरी, अरुण महाजन हे चार सायकलिस्ट सायकल राइड करत सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करीत पद्मालय येथे पोचले. त्या ठिकाणी पोचल्यानंतर पद्मालय देवस्थानचे विश्वस्त डॉ. पिंगळे यांनी पद्मालय तीर्थक्षेत्राबाबत माहिती दिली. शालेय विद्यार्थी अनिकेत पाटील, प्रथमेश मणियार व महिला गटातून कामिनी धांडे यांचा समावेश होता. चाळीसगाव येथील टोनी पंजाबी, रवींद्र पाटील, सोपान चौधरी, अरुण महाजन या चार सायकलिस्टने धुळ्यामार्गे चाळीसगावला परत जात २०० किलोमीटर सायकलिंग केली.
शतक पूर्ण करणाऱ्या सर्व सायकलिस्ट, नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या एनसीएफ मिशन फॉर हेल्थ चॅलेंजमध्ये एक ते तीन हजार किलोमीटर सायकलिंग पूर्ण करणारे सायकलिस्ट जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील प्रा. दीपक दलाल व प्रा. अजय पाटील यांचा सत्कार नियोजन भवनात जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते करण्यात आला. निवृत्त उपायुक्त के. एन. पाटील उपस्थित होते.