दिलासादायक... कोविड केअर सेंटरमधून एकाच दिवशी ४१ रुग्ण कोरोनामुक्त ! 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 जुलै 2020

कोरोना बाधित असलेल्या रुग्णांशी दररोज संपर्क करून महापौर सौ.भारती सोनवणे या माहिती जाणून घेत होत्या. रुग्णांना काही असुविधा असल्यास त्या दूर करण्याचा प्रयत्न महापौरांनी केला.

जळगाव :  कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर मनपाच्या कोविड केअर सेंटरमध्ये उपचारार्थ दाखल झालेले तब्बल ४१ रुग्ण शनिवारी कोरोनामुक्त झाले. सर्व ४१ रुग्णांना शनिवारी कोविड केअर सेंटरमधून सुट्टी देण्यात आली. प्रसंगी महापौर भारती सोनवणे यांनी सर्वांना महिनाभर घरातच राहण्याचा सल्ला देत  इतरांना कोविड योद्धा म्हणून जागरूक करण्याचे आवाहन केले.

जळगाव शहरातील ४१ रुग्णांना कोरोनामुक्त झाल्याने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कोविड केअर सेंटरमधून सुट्टी देण्यात आली. यावेळी महापौर भारती सोनवणे यांनी कोरोनामुक्त झालेल्यांशी संवाद साधला. प्रसंगी स्थायी समिती सभापती ऍड.शुचिता हाडा, नगरसेवक कैलास सोनवणे, नगरसेविका गायत्री राणे, सुरेखा तायडे, चेतन सनकत, अतुलसिंग हाडा, मनोज काळे, डॉ.राम रावलानी, डॉ.शिरीष ठुसे आदी उपस्थित होते.

कोरोना योद्धा म्हणून इतरांना जागरूक करा : महापौर
कोरोना बाधित असलेल्या रुग्णांशी दररोज संपर्क करून महापौर सौ.भारती सोनवणे या माहिती जाणून घेत होत्या. रुग्णांना काही असुविधा असल्यास त्या दूर करण्याचा प्रयत्न महापौरांनी केला. कुटुंबाप्रमाणे काळजी घेतल्याने सर्व रुग्णांनी महापौरांचे आभार मानले. कोरोनामुक्त झालेल्यांना टाळ्या वाजवून घरी पाठविण्यात आले. तसेच पुढील महिनाभर खबरदारी घेण्याचे आणि घरातच राहण्याचे आवाहन देखील महापौरांनी केले. तसेच आपल्या संपर्कातील व्यक्तींना कोरोनामुळे घाबरून न जाता कशी खबरदारी घ्यावी याबाबत प्रत्येकाने मार्गदर्शन करावे असेही त्या म्हणाल्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon 41 patients were released from Covid Care Center