लग्‍नाला झाले पाचच दिवस; लक्ष्मीपुजनापुर्वी विवाहिता फुर्र

राजू कवडीवाले
Sunday, 22 November 2020

येथील विठ्ठल मंदीरात हिंदू रितीरिवाजानुसार डिगंबर देवीदास फेगडे यांच्याशी जालना येथे राहणारी तरुणी सोनाली कुऱ्हाडे हिच्याशी 7 नोव्हेंबरला लग्‍न लावुन देण्यात आले.

यावल (जळगाव) : येथील एका शेतमजुरी करणाऱ्या तरुणाची लग्न लावण्याच्या नावाखाली फसवणुक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. लग्न झालेली नवविवाहीत तरूणीने येथील सासरवाडीतून पळ काढल्याने त्या तरूणाने आपली लग्न लावुन देण्याच्या नावाखाली फसवणुक झाल्याची तक्रार पोलीसात दिली आहे.
यावल येथील डिंगबर देविदास फेगडे यांनी पोलीसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की अकलुद (ता. यावल) येथील साहेबराव कोळी आणी अनिल परदेशी यांनी व बहिणाबाई रावसाहेब अंबुरेरा (रा. दर्गा रोड परभणी) यांनी जालना येथील राहणाऱ्या एका गरीब कुटुंबातील तरूणीशी विवाह लावुन देण्याच्या नावाखाली फसवणुक केली आहे.

७ नोव्हेंबरला विवाहबंधनात
येथील विठ्ठल मंदीरात हिंदू रितीरिवाजानुसार डिगंबर देवीदास फेगडे यांच्याशी जालना येथे राहणारी तरुणी सोनाली कुऱ्हाडे हिच्याशी 7 नोव्हेंबरला लग्‍न लावुन देण्यात आले. दरम्‍यान दिवाळी असल्‍याने लक्ष्मीपुजनाच्या दिवशी नववधूच्या हस्‍ते पुजन करण्याचे नियोजन असताना तत्‍पुर्वीच विवाहिता घरातून गायब झाली होती.

शेजारी दिली चाबी
वसुबारसच्या दिवशी म्‍हणजे 12 नोव्हेंबरला डिगंबर व त्यांचे वडील कामाला गेले होते. घरात एकटी असलेल्या नवविवाहिता सोनाली कुऱ्हाडे हिने घराचा दरवाजा बंद करून चाबी शेजाऱ्यास देत मी मंदीरात जावुन येते; असे सांगुन गेली ती आलीच नाही. अंगावरील पंचविस हजार रुपये किंमतीचे दागिने व पाच हजार रुपयांच्या साड्या आणि मोबाईल घेवुन सोनाली गायब झाली होती. ती उशीरापर्यंत न आल्याने डिगंबर यांनी लग्न लावणाऱ्या साहेबराव कोळी यांच्याशी मोबाईलवर सोनाली संदर्भात विचारणा केली. परंतु कोळी यांनी आपण तुझे लग्न लावुन दिले आहे. सोनाली कुऱ्हाडे, बहीणाबाई यांना आपण ओळखत नसल्याचे सांगीतल्याने लग्न लावुन देण्याच्या नावाखाली एक लाख रुपयात फसवणुक झाल्याचे त्‍यांच्या लक्षात आले. यावरून सोनाली कुऱ्हाडे, साहेबराव कोळी, अनिल परदेशी व बहीणाबाई रावसाहेब अंबुरेरा (रा. दर्गा रोड परभणी) या चारही संशयितांविरुद्ध डिगंबर फेगडे यांनी यावल पोलिसात तक्रार दाखल केली आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon after five days in marriage women robbery jwellry