पहिल्याच दिवशी एसटीच्या तीनशे फेऱ्या 

सचिन जोशी
Friday, 21 August 2020

जळगाव विभागातील पहिली बस जळगाव-चोपडा अशी सकाळी सातला धावली. सकाळी साडेअकराला जळगाव बसस्थानकावरून सोडण्यात आलेल्या जळगाव-धुळे या बसची महाआरती करून बसफेरीचा विधिवत प्रारंभ झाला.

जळगाव : कोरोना महामारीच्या संकटात चार महिन्यांपासून थांबलेली राज्य परिवहन महामंडळाची (एसटी) बस गुरुवार (ता. २०)पासून रस्त्यावर धावू लागली. जिल्ह्याबाहेर बस सुरू झाल्याच्या आजच्या पहिल्या दिवशी प्रवाशांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. तरीही जळगाव विभागातून दिवसभरात तीनशे फेऱ्यांमधून तीन हजारांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला. 

अनलॉकच्या पहिल्या टप्प्यात जिल्हांतर्गत प्रवासी सेवा सुरू करण्याचे नियोजन आखण्यात आले होते. मात्र कोरोनाच्या भीतीमुळे बसला प्रवासी मिळत नसल्याने तोटाच अधिक सहन करावा लागत होता. यानंतर ‘मिशन बिगीन’अंतर्गत आता जिल्ह्याबाहेर बससेवा सुरू करण्याचे आदेश देत त्याची आजपासून सुरवात झाली. 

महाआरतीने प्रारंभ 
चार महिन्यांनंतर बससेवा सुरू होणार असल्याने प्रवाशांसोबत कर्मचाऱ्यांमध्येही उत्साह होता. यात जळगाव विभागातील पहिली बस जळगाव-चोपडा अशी सकाळी सातला धावली. सकाळी साडेअकराला जळगाव बसस्थानकावरून सोडण्यात आलेल्या जळगाव-धुळे या बसची महाआरती करून बसफेरीचा विधिवत प्रारंभ झाला. विभाग नियंत्रक राजेंद्र देवरे, आगारप्रमुख प्रज्ञेश बोरसे, स्थानकप्रमुख नीलिमा बागूल यांच्यासह चालक- वाहक उपस्थित होते. 

तीन हजारांहून अधिक प्रवासी 
जळगाव विभागांतर्गत असलेल्या अकरा आगारांमधून दिवसभरात साधारण तीनशे फेऱ्या झाल्या. फेऱ्या सोडताना बस सॅनिटाइझ करून सोडण्यात आली. तसेच एका बसमधून केवळ २२ प्रवासी बसविण्यात आले. त्यानुसार जळगाव विभागातून दिवसभरात झालेल्या तीनशे फेऱ्यांमधून तीन हजारांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला. 

आज जळगाव-पुणे बस रवाना 
लालपरीची सेवा सुरू झाल्यानंतर प्रतिसाद मिळू लागला. जळगाव विभागाला खऱ्या अर्थाने उत्पन्न मिळणाऱ्या जळगाव- पुणे मार्गावर आज फेरी सोडण्यात आली नाही. मात्र काही जणांनी पुणे जाण्याची तयारी दर्शविल्यानंतर बस सोडण्याचे निश्‍चित करण्यात आले. त्यानुसार शुक्रवारी सकाळी सातला जळगाव- पुणे बस सोडण्यात आली.

 

संपादन- भूषण श्रीखंडे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon After four months, ST ran out of the district