भाजप कार्यालयावरच त्‍याचा संताप; जाळपोळ करण्याचा प्रयत्‍न

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 8 November 2020

माजी मंत्री गिरीश महाजन यांना शिवीगाळ केली होती. यानंतर त्‍यास बाहेर काढले असता त्‍याने गाडीवर दगडफेक देखील केली होती. यामुळे या माथेफिरूचा भाजप कार्यालयावर का संताप निघतोय याची चर्चा सुरू आहे. यानंतर मध्‍यरात्रीनंतर भाजप कार्यालय आवारात जाळपोळ करण्याचा प्रयत्‍न करण्यात आला.

जळगाव : भाजपा कार्यालयात मध्यरात्री एका माथेफिरूने कचरा आणून दरवाजाजवळ जाळपोळ केल्याचा प्रकार समोर आल्याने पोलिसांची एकच धावपळ उडाली. याप्रकरणी संशयिताला अटक करण्यात आली असून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

शहरातील बळीराम पेठेत भारतीय जनता पक्षाचे वसंत स्मृती हे कार्यालय आहे. शनीवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास माथेफिरू विजय श्रीराम पवार (वय ४३ख् रा. मामलेदार केचरीजवळ बळीराम पेठ) याने कचरा आणि टायर भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाच्या उजव्या बाजूला असलेल्या खोलीच्या बंद असलेल्या लाकडी दरवाजा जवळ टाकले. आगपेटीने तो कचरा पेटवून दिला. यात दरवाजा अर्धवट जळाला आहे. 

कर्मचारी आला अन्‌ प्रकार उघडकीस
सकाळी ८ वाजेच्या सुमारास भाजपा कार्यालयातील कर्मचारी गणेश माळी कार्यालय उघडण्यासाठी आला असता प्रकार लक्षात आला. त्यावेळी अर्धवट जळालेल्या दरवाजातून धुर निघत होता. गणेश माळी यांनी तत्काळ प्रकाश भगवानदास पंडीत यांना माहिती दिली. सकाळी कार्यालयीन कर्मचारी यांनी पाण्याने ही आग विझविली. दरम्यान, भाजपा कार्यकर्ता प्रकाश भगवान पंडीत यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. चौकशीअंती यापुर्वी या कार्यालयात काम करणारा विजय श्रीराम पवार असल्याचे समोर आले. विजय पवार हा मनोरूग्ण आल्याने त्याला शहर पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील कारवाईसाठी वैद्यकिय तपासणीसाठी रवाना करण्यात आले. 

भाजप कार्यालयावर नजर
माथेफिरू असलेल्‍या विजय पवार याने यापुर्वी देखील भाजप कार्यालयात असा प्रकार केला आहे. दोन आठवड्यांपुर्वी देखील असाच धक्‍कादायक प्रकार उघडकीस आला होता. त्‍याने माजी मंत्री गिरीश महाजन यांना शिवीगाळ केली होती. यानंतर त्‍यास बाहेर काढले असता त्‍याने गाडीवर दगडफेक देखील केली होती. यामुळे या माथेफिरूचा भाजप कार्यालयावर का संताप निघतोय याची चर्चा सुरू आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon anger at the BJP office itself attempt to set fire