जिल्ह्यातील वार्षिक १५०० कोटींची उलाढाल ठप्प...शेकडो कामगार बेरोजगार 

सचिन जोशी
Saturday, 25 July 2020

कंटेनर महामंडळाच्या युनिटमध्ये मालाचे लोडिंग, वाहतुकीचे काम मक्तेदार एजन्सीकडून करून घेतले जाते. एजन्सीचे जवळपास शंभरावर कर्मचारी बेरोजगार झाले.

जळगाव  : केळी या मुख्य फळपिकासह कापसाचे हब, पीव्हीसी पाइप व ठिबक निर्यातीचे मुख्य केंद्र आणि व्यावसायिकदृष्ट्या ‘पोटेंशिअल’ असलेल्या जळगाव व खानदेशासाठी पूरक कंटेनर महामंडळाचे युनिट बंद झाल्याने वार्षिक दीड हजार कोटीची उलाढाल ठप्प झाली. शिवाय या युनिटमध्ये काम करणारे कर्मचारी तसेच मक्तेदाराकडील शेकडो कामगारही बेरोजगार झाले. एकट्या जळगाव जिल्ह्यातील सुमारे २५ निर्यातदारांसमोर मालनिर्यातीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

जळगाव व खानदेशातील मालाच्या निर्यातीसाठी ‘कॉनकॉर’ अर्थात, कंटेनर महामंडळांतर्गत रेल्वेच्या भुसावळ विभागात युनिट सुरू होते. या माध्यमातून जळगाव जिल्ह्यासह धुळे व परिसरातील माल मुंबई, पुणे, नागपूरसह देशातील अन्य भागांत निर्यात होत होता. शिवाय, कच्च्या मालाची आयातही याठिकाणी होत होती. 

दोन महिन्यांपासून तिढा 
रेल्वेने या महामंडळाला आपली जागा भाडेतत्त्वावर दिली होती. मात्र, काही महिन्यांपूर्वी रेल्वेने या जागेचे भाडे अवाजवी प्रमाणात वाढविल्याने महामंडळाचे हे युनिट चालविणे कठीण झाले. महामंडळाने थेट युनिट बंद करण्याचा निर्णय मेमध्ये घेतला. खानदेशातील विशेषत: जळगाव जिल्ह्यातील लहान-मोठ्या निर्यातदार कंपन्या, एजन्सीने याबाबत रेल्वेच्या मुख्य व्यवस्थापकांसह मंत्रालय, वाणिज्य मंत्रालयाकडे तक्रारी केल्या. स्थानिक खासदार उन्मेश पाटील, रक्षा खडसेंनी यासंदर्भात रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून युनिट सुरू ठेवण्यासाठी पाठपुरावा केला. 

अखेर युनिट बंद 
तत्कालीन स्थितीत रेल्वे व ‘कॉनकॉर’च्या अधिकाऱ्यांची चर्चा होऊन हे युनिट सुरू राहिले. काही दिवसांपूर्वी युनिटच्या सर्व यंत्रणेने युनिट बंद करून गाशा गुंडाळला आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातून होणारी निर्यात व आयातही ठप्प झाली आहे. 

१५०० कोटींची उलाढाल 
कंटेनर महामंडळाच्या युनिटमध्ये मालाचे लोडिंग, वाहतुकीचे काम मक्तेदार एजन्सीकडून करून घेतले जाते. एजन्सीचे जवळपास शंभरावर कर्मचारी बेरोजगार झाले. शिवाय दर महिन्याला शे-दीडशे कोटींची म्हणजे वार्षिक सुमारे दीड हजार कोटीची उलाढाल ठप्प झाली. 

पाठपुराव्याला अपयश 
जैन उद्योगसमूहातील निर्यात विभागाचे प्रमुख अधिकारी डी. आय. देसरडा यांनी यासंदर्भात रेल्वे महाव्यवस्थापक, मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह रेल्वेमंत्री, वाणिज्यमंत्री, केंद्रीय अर्थमंत्री यांच्यासह सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री या सर्वांशी पत्रव्यवहार करून याबद्दलची वस्तुस्थिती मांडली. परंतु उपयोग झाला नाही. स्थानिक खासदारांनीही यासंबंधी पाठपुरावा केला, मात्र त्यालाही यश आले नाही. 

या उद्योगांवर परिणाम 
मुळात जळगाव जिल्हा केळीचे मोठे हब आहे. कापूस उत्पादनही या जिल्ह्यात तसेच धुळे, अकोला जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात होते. मकाही याठिकाणाहून निर्यात केला जातो. जैन उद्योगसमूहासारख्या मोठ्या उद्योगातून केळी, मसाले, कांदा व लसणाची पावडर, फळांचे ज्यूस यांसह अन्य उत्पादनांची मोठ्या प्रमाणात निर्यात होते. पीव्हीसी पाइप व ठिबकच्या नळ्यांच्या उत्पादनातही जिल्हा अग्रेसर असून, चटई उद्योगाचेही केंद्र असल्याने ही उत्पादनेही देशभर पाठवली जातात. जळगावातील डाळ उद्योग मोठा असून, रोज कोटींची डाळ निर्यात केली जाते. अश सर्व उद्योगांना युनिट बंदच्या निर्णयाने फटका बसला आहे. 

रेल्वे, कॉनकॉरचा आडमुठेपणा 
रेल्वेने महामंडळाला दिलेल्या जागेच्या भाड्यात अवाजवी वाढ केली. महामंडळाने परवडत नाही, म्हणून युनिट बंद करण्याचा निर्णय घेतला. असे अन्य युनिटही बंद करण्याचा निर्णय झाला आहे. रेल्वे भाडे कमी करायला तयार नाही आणि महामंडळही परवडत नाही या कारणाखाली थोडीफार भाडेवाढ करायला तयार नाही, अशा दोघांच्या आडमुठेपणामुळे ही स्थिती उद्‍भवल्याचे बोलले जात आहे. 

 संपादन-भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Annual turnover of Rs 1500 crore stalled in the district.