52 वर्षांची परंपरा खंडित..."कोरोना'मुळे गजानन महाराज संस्थानची आषाढी वारी रद्द 

अमोल भट  
Saturday, 13 June 2020

भाविकांना तीर्थयात्रा घडावी आणि वारकरी संप्रदायाच्या महान परंपरेची जपणूक व्हावी, या उद्देशाने श्री गजानन संस्थानातर्फे 1968 पासून ही परंपरा अखंडितपणे सुरू होती.

जळगाव  : "कोरोना' संसर्गामुळे राज्यातील अनेक धार्मिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर 1968 पासून श्रीक्षेत्र पंढरपूरला पायी वारीने पालखी नेण्याचा गेल्या 52 वर्षांपासून सुरू असलेला विदर्भातील सर्वांत मोठा व शिस्तीसाठी प्रसिद्ध असलेला शेगाव येथील श्री संत गजानन महाराज संस्थानचा आषाढी वारी पालखी सोहळाही रद्द करण्यात आला आहे. 
संपूर्ण महाराष्ट्रातून श्रीक्षेत्र पंढरपूरला बहुतेक सर्व संतांच्या पालख्या दिंड्यांसह नेण्याची परंपरा आहे. भाविकांना तीर्थयात्रा घडावी आणि वारकरी संप्रदायाच्या महान परंपरेची जपणूक व्हावी, या उद्देशाने श्री गजानन संस्थानातर्फे 1968 पासून ही परंपरा अखंडितपणे सुरू होती. यंदा मात्र "कोरोना'च्या पार्श्वभूमीवर पालखीच्या परंपरेला खंड पडला आहे. 

असा असतो श्रींच्या पालखीचा प्रवास 
श्रींच्या पालखी सोहळ्यास 52 वर्षांची परंपरा आहे. यंदाचे 53 वे वर्ष होते. पालखी एकूण 61 दिवस पायी प्रवास करते. यात साधारण 650 वारकरी सहभागी होतात. शेगाव ते श्रीक्षेत्र पंढरपूरपर्यंत 750 कि.मी. आणि श्रीक्षेत्र पंढरपूर ते शेगावपर्यंत परतीचा प्रवास हा 550 किलोमीटर, असा एकूण 1300 किलोमीटरचा प्रवास असतो. 

याशिवाय श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर, श्रीक्षेत्र पैठण, श्रीक्षेत्र मुक्ताईनगर याठिकाणीही संस्थानाच्या वारीनिमित्त पालखी जाते. आषाढी वारीकरिता पंढरपूरला जाताना वारकरी दरवर्षी सोबत निघतात. पालखी सोहळ्यामुळे विवेक, वैराग्य, भक्ती व ज्ञान या तत्त्वांचा भाविकांना बोध होतो. व आध्यात्मिक कार्य गतिमान होऊन धर्माप्रती श्रद्धा व भावना वृद्धिंगत होतात. गावात हरिनामाचा प्रसार करून तेथील ग्रामस्थांचे जीवन (आयुष्य) सुखकर करणे, तेथील व्यसनाधीनता, अंधश्रद्धा दूर करणे हे या वारीमागचे आणखी एक कारण. संस्थानच्या पायी वारीकरिता महाराजांची चांदीची नवीन पालखी बनारस येथील कारागीर आणून तयार करून घेण्यात आली आहे. त्यावरील नक्षीकाम अत्यंत सुंदर असून, ही पालखी पाहताक्षणी अंतःकरणातील भक्तिभाव दाटून येतो. 

असा असतो पालखीचा मार्ग 
पालखीचे शेगाव येथून प्रस्थान झाल्यावर श्रीक्षेत्र नागझरी, गायगाव, भौरद, अकोला, भरतपूर, वाडेगाव, देऊळगाव, पातुर, मेडशी, श्रीक्षेत्र डव्हा, मालेगाव, शिरपूर जैन, चिंचाबा पेन, म्हसला पेन, किनखेडा, रिसोड, पानकन्हेरगाव मार्गे श्रीक्षेत्र पंढरपूर येथे पोहोचते. 

शेगाव संस्थानातर्फे पत्रक जारी 
संस्थानातर्फे जारी करण्यात आलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे, की जगभरात "कोरोना'चे संकट ओढवले आहे. त्यामुळे सर्वच हतबल झाले आहेत. वारीप्रसंगी सर्व अडचणी लक्षात घेता श्रीक्षेत्र पंढरपूर येथे संस्थानाची कायम शाखा झाली आहे. श्रींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होऊन नित्य पूजाअर्चा, सोपस्कार व नियमाप्रमाणे कार्यक्रम केले जातात. पंढरीनाथांच्या चरणी नित्य सेवा भक्तिभावाने कायम होत आहे. त्यामुळे श्रींचा पालखी सोहळा रद्द करण्यात आला आहे. अशाप्रसंगी श्री पालखी (श्री पादुका) पंढरपुरास नेणे उचित ठरणार नसल्याचे व्यवस्थापकीय विश्‍वस्तांनी पत्रकात म्हटले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Ashadhi Wari of Gajanan Maharaj Sansthan canceled due to "Corona"