esakal | हॅकरला वीस टक्‍क्‍यांची आमिष; तोच फुटला अन्‌ पडल्‍या पोलिसांच्या बेड्या
sakal

बोलून बातमी शोधा

atm clone hacking

दोन महिन्यांपूर्वी काही लोक हॅकर मनीष भंगाळेच्या संपर्कात आले. ते विविध बँकांच्या खात्यांची माहिती, एटीएम कार्डचा फोटो असा डाटा देऊन ऑनलाइन पद्धतीने चोरी करून संबंधितांचे पैसे काढून द्यावेत यासाठी दबाव टाकत होते.

हॅकरला वीस टक्‍क्‍यांची आमिष; तोच फुटला अन्‌ पडल्‍या पोलिसांच्या बेड्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : ऑनलाइन व्यवहार वाढल्यानंतर त्यासंबंधी गुन्हेही मोठ्या प्रमाणात वाढले असून, अशा गुन्हेगारांवर मात्र वचक नाही. एटीएम कार्डचा डाटा हॅक करून कोट्यवधींच्या लुटीच्या प्रयत्नातील संशयित आधी मनीष भंगाळेच्या संपर्कात आले. त्याला २० टक्क्यांचे आमिष दाखवून व्यवहार ठरवला. यात देशभरात टोळी सक्रिय असल्याचे समोर येत आहे. 
दोन महिन्यांपूर्वी काही लोक हॅकर मनीष भंगाळेच्या संपर्कात आले. ते विविध बँकांच्या खात्यांची माहिती, एटीएम कार्डचा फोटो असा डाटा देऊन ऑनलाइन पद्धतीने चोरी करून संबंधितांचे पैसे काढून द्यावेत यासाठी दबाव टाकत होते. यादरम्यान मनीष त्याच्या मित्रासोबत गुजरातलाही गेला. त्या ठिकाणी काही जणांनी त्यांना बँक खात्यांची माहिती, फोटो दिले व संबंधित खातेधारकांची रक्कम ऑनलाइन चोरी करून ट्रान्स्फर करण्याबाबत सांगितले होते. 

भंगाळेला आमिष अन्‌ दबावही 
यात जळगाव शहरातील हेमंत पाटील याने मनीषला संबंधित बँक धारकांच्या माहितीवरून ऑनलाइन पैसे काढून देण्याबाबत गळ घातला होता. तसेच या कामाबद्दल त्यांनी मनीष भंगाळेला २० टक्के रक्कम देण्याचे आमिषही दाखविले होते. हेमंत भंगाळेसह यात नगर, गुजरात, राजस्थान, नाशिक यासह विविध ठिकाणांचे लोकही सहभागी असल्याचे भंगाळे यास कळाले. या सर्वांनी भंगाळेला विविध ठिकाणच्या बँकांच्या खातेधारकांचा गोपनीय डाटा चोरून तो मनीषला पुरवला व त्या माध्यमातून ऑनलाइन पैसे काढण्यासाठी सर्व जण मनीषला आमिष दाखवून त्याच्यावर दबाव टाकत होते. 

पोलिसांना दिली माहिती 
मनीषने संबंधित सर्व बँक डाटा मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवला. या गंभीर प्रकाराबाबत १२ ऑक्टोबरला मनीषने रामानंदनगर ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिल बडगुजर यांना माहिती दिली. बडगुजर यांनी गोपनीय पद्धतीने माहिती काढली असता, चोरीच्या मार्गाने संबंधितांनी विविध बँकांच्या खातेधारकांची माहिती मिळविल्यासह अनेकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक करण्यासाठी टोळी सक्रिय असल्याचे समोर आले. 

एक हजाराचा ‘प्रयोग’ 
निरीक्षक अनिल बडगुजर यांनी अधीक्षक डॉ. मुंढे यांना माहिती दिली. त्यांच्या सूचनेनुसार बडगुजर यांनी सुरवातीला ज्या उद्देशाने संशयितांनी बँकेचा डाटा पाठविला होता, त्यानुसार संशयितांना अडकविण्यासाठी नियोजन केले. यात मनीष भंगाळे यांच्या मदतीने संशयितांनी दिलेल्या एका बँकधारकाच्या माहितीच्या आधारावर त्याचे एक हजार रुपये काढण्यात आले. यानंतर संबंधित हजार रुपयांपैकी हेमंत पाटील, धुळे येथील मोहसीन या दोघांच्या खात्यावरून प्रत्येकी २५० रुपये, तर तिसऱ्याच्या खात्यावर पाचशे रुपये पाठविण्यात आले. 
 
शिताफीने पकडले दोघांना 
एक हजार रुपयांचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता उर्वरित असलेल्या बँक धारकांच्या डाटानुसार त्यांची आहे ती रक्कम काढण्याचे असल्याचे सांगत मनीष भंगाळेकरवी संशयितांना १४ तारखेस जळगावात बोलविण्यात आले. पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली बडगुजर यांनी कॉन्स्टेबल रवींद्र चौधरी यास साध्या वेशात मनीषसोबत संशयित ज्या ठिकाणी येणार होते, तेथे तैनात केले. हेमंत पाटील व मोहसीन खान हे संशयित एकलव्यजवळ आले. इशारा मिळताच निरीक्षक बडगुजर यांच्यासह सतीश डोलारे, जयंत कुमावत, विनोद सोनवणे, जितेंद्र तावडे, संतोष गिते यांच्या पथकाने सापळा रचून हेमंत पाटील व मोहसीन खान याला अटक केली. 

‘ती’ रक्कम ४१२ कोटी 
त्याच्याजवळील मोबाईलसह त्याच्याजवळ असलेल्या सर्व वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. अत्यंत क्लिष्ट स्वरूपाचा गुन्हा असल्याने या गुन्ह्याची फिर्याद तयार करताना पोलिसांना पाच ते सहा तास लागले. रात्री अकरापासून सुरू असलेले गुन्हा नोंदविण्याचे काम पहाटे पाच ते सहाला संपले. ज्यांच्या खात्यांचा डाटा हॅक झाला, त्यांच्या खात्यावर तब्बल ४१२ कोटींची रक्कम असल्याचे समोर आले आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे