वादळी तडाख्याने फळबागा आडव्या; कपाशीचेही नुकसान 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 20 September 2020

अनेक भागात शनिवारी रात्री वादळी वाऱ्यासह जोरदार पाउस झाला. उत्राण व रिंगणगाव परिसरातील कापूस व फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. उत्राण परिसरातील शेकडो एकरवरील लिंबाच्या बागा वादळामुळे उद्ध्वस्त झाल्या. लिंबाची झाडे शेतातच उन्मळून पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे.

एरंडोल (जळगाव) : तालुक्यात शनिवारी रात्री अनेक भागात जोरदार वाऱ्यासह पाऊस झाल्यामुळे कपाशी व फळबागांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. वादळी पावसामुळे कापूस व लिंबाची झाडे आडवी पडल्यामुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. शासनाने नुकसानग्रस्त पिकांचे व फळबागांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 
तालुक्यातील अनेक भागात शनिवारी रात्री वादळी वाऱ्यासह जोरदार पाउस झाला. उत्राण व रिंगणगाव परिसरातील कापूस व फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. उत्राण परिसरातील शेकडो एकरवरील लिंबाच्या बागा वादळामुळे उद्ध्वस्त झाल्या. लिंबाची झाडे शेतातच उन्मळून पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. तसेच कापसाचे देखील मोठे नुकसान झाले असून, झाडे आडवी पडली आहेत. याशिवाय ज्वारी, मका, सोयाबीन या पिकांना देखील वादळी पावसाचा फटका बसला आहे. रिंगणगाव परिसरात देखील कापूस व अन्य पिकांचे नुकसान झाले आहे. तालुक्यात शनिवारी उत्राण येथे ३२ तर रिंगणगाव येथे ३५ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. तालुक्यात कापसाच्या वेचणीस सुरवात झाली आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून दररोज पडणाऱ्या पावसामुळे कापसाची बोंडे झाडावरच सडत असून, कापूस देखील ओला होत आहे. तर ज्वारीची कणसे काळी पडू लागली आहेत. मूग, उडीद यासह अन्य कडधान्याचे नुकसान यापूर्वीच झाले आहे. 

तातडीने पंचनामे करा 
यंदा कापूस, सोयाबीन व ज्वारी या पिकांना पावसाचा फटका बसत असल्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे. याबाबत शासनाने त्वरित दाखल घेऊन वादळी वाऱ्यामुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.

रावेर तालुक्‍यातही तडाखा
रावेर तालुका परिसरात देखील पावसाने जोरदार तडाखा दिला. शनिवारी सायंकाळी झालेल्या वादळीवाऱ्यासह पावसामुळे  सावखेडा, खिरोदा, रोझोदा, कोचुर येथे उभ्या पिकाचे केळी, ज्वारी, मका पिकाचे अतोनात नुकसान झाले. तसेच कोचुर येथील शेतकरी संतोष घनश्याम परदेशी यांचे दीड एकर क्षेत्रातील मका पिकाचे एक लाखाचे नुकसान झाले. तर कांदेबाग, पिलबाग, जुनारी या केळी पिकाचे जवळ जवळ दीड हजार उभे पिक जमीनदोस्त झाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon banana cotton loss in heavy rain and storm