घरकुलनंतर आता बीएचआरसाठी प्रवीण चव्हाण सरकारी अभियोक्ता

रईस शेख
Monday, 7 December 2020

घरकुल खटल्यात संशयितांना सात वर्षापर्यंत शिक्षा सुनावण्यात आली होती. तर राज्यात एकमेव खटला असा होता की, त्यात 183 कोटींचा दंड संशयितांना ठोठावण्यात आला होता.

जळगाव : राज्यभरात बहुचर्चित असलेल्या जळगाव शहरातील घरकुल घोटाळ्यात प्रसिध्दीस आलेले विशेष सरकारी वकील अ‍ॅड. प्रवीण चव्हाण यांचीच बीएचआर घोटाळ्याच्या खटल्यात विशेष सरकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. घरकुल खटल्यात संशयितांना सात वर्षापर्यंत शिक्षा सुनावण्यात आली होती. तर राज्यात एकमेव खटला असा होता की, त्यात 183 कोटींचा दंड संशयितांना ठोठावण्यात आला होता.

राज्यभरातील बहुचर्चित असलेल्या घरकुल खटल्याप्रमाणेच ठाणे येथील 312 कोटी रुपयांचा घोटाळा असलेल्या रमेश कदम खटला न्यायालयात सुरु आहे. या खटल्यातही विशेष सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. प्रवीण चव्हाण यांची नियुक्ती झाली असून, ते सरकारपक्षातर्फे कामकाज पाहत आहेत. 2015 मधील या गुन्ह्यात 27 आरोपी असून, सर्व आरोपी आजपावेतो कारागृहातच आहेत. 2014- 15 मधील समृध्दी जीवन योजनेतील 3 हजार कोटींच्या घोटाळ्यात दहा संशयित आहेत. या खटल्याचेही कामकाज सुरु असून, यातही सरकारपक्षातर्फे अ‍ॅड. चव्हाण काम पाहत आहेत.

नागपूरच्या बहुचर्चित खटल्‍याचेही काम
नागपूर येथील 5 कोटींच्या घोटाळ्यात नागपूर येथे दशहत माजविणारा संशयित संतोष अंबेकर यास मोक्का लागला आहे. या बहुचर्चित खटल्यात सरकारतर्फे अ‍ॅड. प्रवीण चव्हाण हेच कामकाज पाहत आहे. नुकताच वर्षभरापूर्वी पुण्यातील 100 कोटींचा एज्युकेशन घोटाळा उघडकीस आला. यात 27 आरोपी असून, हा घोटाळा आणखी वाढण्याची शक्यता आहे. यात सरकारपक्षातर्फे अ‍ॅड. प्रवीण चव्हाण कामकाज पाहत आहेत आणि आता नुकताच पुणे आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास होत असलेल्या बीएचआर घोटाळ्यातही सरकारपक्षातर्फे विशेष सरकारी म्हणून अ‍ॅड. प्रवीण चव्हाण यांची नियुक्ती झाली आहे. त्यामुळे इतर खटल्यांप्रमाणेच बीएचआर घोटाळ्याचा खटलाही गाजण्याची शक्यता आहे.

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon bhr fraud case praveen chavan government prosecutor