
ज्येष्ठ ठेवीदार किंवा गरजू ठेवीदार, ज्यांना पैशांची नितांत गरज होती, जे अवसायकापर्यंत पोचू शकत नव्हते अशांनी ठेवीदार संघटनेत सहभागी होऊन मिळेल ती रक्कम, किमान मुद्दल मिळाली तरी पुरे अशी आशा ठेवली.
जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेचे (बीएचआर) ९५ हजार ठेवीदार अद्यापही वाऱ्यावरच आहेत. खरेतर ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत मिळवून देण्यासाठी पतसंस्थेवर अवसायकाची नियुक्ती केली होती. मात्र, अवसायक जितेंद्र कंडारे याने स्वतःसोबतच, राजकारणी, उद्योजक व धनदांडग्यांचाच फायदा केला. ठेवीदारांची केवळ एकूण ठेवींच्या ३० टक्क्यांवरच बोळवण केली, असा आरोप आता ठेवीदार करू लागले आहेत.
‘बीएचआर’ पतसंस्था असली तरी अध्यक्ष व संचालक मंडळाच्या विश्वासावर ठेवीदारांनी ठेवी ठेवल्या. नऊ राज्यात ‘बीएचआर’ला मान्यता होती. त्यातून नवी दिल्लीतील सहकार विभागाच्या अंतर्गत ही पतसंस्था होती. ९५ हजार ठेवीदारांनी तब्बल ७०० कोटींच्या ठेवी ठेवल्या होत्या. २२ हजार कर्जदार होते. २०१५ मध्ये अवसायक म्हणून कंडारेची नियुक्ती झाली होती. सहकार विभागाचा अनुभव असल्याने त्याने पद्धतशीरपणे कर्जदारांकडून काही प्रमाणात कर्ज वसूल करण्यास सुरवात केली. मात्र जेव्हा ठेवीदार विशेषतः शासकीय नोकरीतील व कोट्यवधींच्या ठेवी त्यांच्या आढळल्या, ठेवीदारांचे वय ६० च्या वर आढळले तेव्हा त्याने ठेवीदारांना गंडविण्याचा, त्यांच्याकडून पावत्या घेऊन ३० टक्क्यांवर त्यांची बोळवण करायची, इतर ७० टक्के मलिदा त्याने व इतरांनी पचवायचा असा प्लॅन त्यांनी आखला होता, हे आता उघडकीस येत आहे.
ज्येष्ठ ठेवीदार किंवा गरजू ठेवीदार, ज्यांना पैशांची नितांत गरज होती, जे अवसायकापर्यंत पोचू शकत नव्हते अशांनी ठेवीदार संघटनेत सहभागी होऊन मिळेल ती रक्कम, किमान मुद्दल मिळाली तरी पुरे अशी आशा ठेवली. त्यातील काहींना मुद्दल किंवा त्यापेक्षा कमी रक्कम मिळाल्याने त्यांचा व इतरांचा एजंटावरील विश्वास वाढीस लागला.
स्वखुशीने २० टक्के कमिशन
ठेवीदारांनी काही एजंटांना संमतीपत्रावर (स्टँपपेपरवर) लिहून दिले आहे, की माझी बीएचआरमध्ये एवढी रक्कम आहे. त्यातील २० टक्के रक्कम यांना मी स्वखुशीने देणार आहे, त्यास माझी हरकत नाही. असे अनेक दस्तऐवज पुण्याच्या पथकाला आढळून आले आहेत. त्याआधारे किती ठेवीदारांना ठेवीच्या रकमेपेक्षा कमी रक्कम मिळाली याचा शोध घेतला जात आहे.
संपादन ः राजेश सोनवणे